ज्येष्ठ नागरिकांनो, कुठलीही मदत हवीय... या हेल्पलाईनवर मिळेल तातडीने मोफत सेवा...

Share:
Main Image
Last updated: 10-Jan-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १० जानेवारी - सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था आणि राज्य सरकारांच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी १४५६७ ही राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाईन देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात ही सेवा जनसेवा फाउंडेशन, पुणे यांच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवली जात आहे. गरजू ज्येष्ठ नागरिकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी १४५६७ या क्रमांकावर संपर्क साधून या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विनोद शाह यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

“घरात असूनही एकटे आहोत…”, “मुलगा परदेशात आहे…”, “नातेवाईकांनी घराबाहेर काढले…” अशा वेदनादायक अनुभवांची कहाणी महाराष्ट्रासह देशभरातील अनेक ज्येष्ठ नागरिक ‘एल्डर लाईन १४५६७’ या हेल्पलाईनवर मोकळेपणाने मांडत आहेत. ज्येष्ठांच्या अडचणी ऐकून घेणारी, त्यांना मार्गदर्शन व प्रत्यक्ष मदत देणारी ही सेवा आज अनेकांसाठी आधारवड ठरत आहे.

“मानवसेवा हीच ईश्वरसेवा” हे ब्रीदवाक्य घेऊन जनसेवा फाउंडेशन गेल्या ३७ वर्षांपासून सातत्याने समाजसेवेचे कार्य करत आहे. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली गरीब, आजारी, वृद्ध, अपंग, निराधार, महिला तसेच गरीब मुला-मुलींसाठी विविध कल्याणकारी प्रकल्प राबवले जात आहेत. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत संस्थेला संयुक्त राष्ट्रसंघाचा विशेष दर्जाही प्राप्त झाला आहे.

महाराष्ट्रातील उल्लेखनीय कामगिरी
ऑगस्ट २०२१ पासून सुरू झालेल्या ‘एल्डर लाईन १४५६७’ या राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाईनवर आतापर्यंत ४ लाखांहून अधिक कॉल्स प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३० हजारांहून अधिक प्रकरणांमध्ये क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष हस्तक्षेप करून ज्येष्ठ नागरिकांना तात्काळ मदत करण्यात आली आहे

हेल्पलाईनद्वारे मिळणाऱ्या प्रमुख मोफत सेवा
माहिती सेवा: आरोग्य, पोषण, निवारा, आश्रयगृहे, वृद्धाश्रम, डे-केअर सेंटर्स याबाबत सविस्तर माहिती.
मार्गदर्शन: कायदेशीर, मालमत्ता व कौटुंबिक वादांमध्ये मोफत सल्ला, पेन्शन योजना, तसेच ज्येष्ठ नागरिकांचे चरितार्थ व कल्याण अधिनियम २००७ संदर्भातील माहिती.
भावनिक आधार: मानसिक ताण, चिंता, एकटेपणा, नैराश्य यावर समुपदेशन व आधार.
संरक्षण व पुनर्वसन: छळ, बेघरपणा किंवा अत्याचारग्रस्त वृद्धांसाठी मदत, कुटुंबीयांशी संवाद, पोलीस प्रशासनाशी समन्वय व आवश्यक ते पुनर्वसन.

‘एल्डर लाईन १४५६७’ ही केवळ एक हेल्पलाईन नसून, ज्येष्ठ नागरिकांसाठी विश्वासाचा हात आणि सुरक्षित आधार आहे. या माध्यमातून वृद्धांच्या गरजा समजून घेतल्या जातात आणि त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी आवश्यक ती मदत दिली जाते. ज्येष्ठांसाठी ही सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने जागरूक राहणे गरजेचे आहे, असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.  शाह सांगतात.

Comments

No comments yet.