पुणे, (प्रतिनिधी) १० जानेवारी - पुणे येथे सुरू झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित, राज्यस्तरीय, १९ वर्षांखालील महिलांच्या आमंत्रितांच्या अव्वल साखळी क्रिकेट स्पर्धेत (इन्व्हिटेशन सुपर लीग), नाशिकने ज्युडिशियल, पुणेवर ८ गडी राखून मोठा विजय मिळवला. श्रुती गीते, सिद्धी पिंगळे व प्रचिती भवरने विजयात मोठा वाटा उचलला.
प्रथम फलंदाजी केलेल्या ज्युडीशियल, पुणे संघाला नाशिकने ४०.४ षटकांत सर्वबाद १०३ असे रोखले. यात नाशिकच्या सिद्धी पिंगळे व प्रचिती भवरने प्रत्येकी ३ तर मधुरा दायमाने १ बळी घेतला. अवंति घोलपने सर्वाधिक ३२ धावा केल्या. विजयासाठीच्या १०४ धावा नाशिकने कर्णधार श्रुती गीतेच्या नाबाद ५४ धावांच्या जोरावर २१.५ षटकांत ८ गडी राखून सहज पार केल्या. प्रचिती भवरने अष्टपैलू चमक दाखवत २९ धावा केल्या तर कार्तिकी गायकवाडने नाबाद १८ धावा करून नाशिकला विजयी केले.