नाशिक शहरात रस्ते अपघात सुरूच... वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार...

Share:
Last updated: 10-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १० जानेवारी - भरधाव दुचाकीच्या धडकेत रस्ता ओलांडणारा ७५ वर्षीय वृध्द पादचारी ठार झाला. हा अपघात महामार्गावरील जकातनाका भागात झाला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुरलीधर भागा शिंदे (रा.मनुदेवी मंदिर जकात नाका आडगाव) असे मृत वृद्धाचे नाव आहे. शिंदे गुरुवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास महामार्गावरील पंजाब खालसा हॉटेल समोर रस्ता ओलांडत असतांना हा अपघात झाला. नाशिककडून ओझरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या अज्ञात दुचाकीने त्यांना धडक दिली. या अपघातात शिंदे गंभीर जखमी झाले होते. कुटूंबियांनी त्यांना नजीकच्या आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता शुक्रवारी उपचार सुरू असतांना डॉ. निशांत शिंदे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. तपास हवालदार पाटील करीत आहेत.

गाडीचा धक्का लागून वृद्धेचा मृत्यू

नाशिक : चारचाकी वाहन पाठीमागे घेत असतांना धक्का लागल्याने जखमी झालेल्या वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा प्रकार देवळाली गाव भागात घडला होता. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रजनी सुधाकर चंद्रमोरे (६५ रा.सोलाकुंश निवास राजवाडा बौध्दनगर देवळाली गाव) असे मृत महिलेचे नाव आहे. रजनी चंद्रमोरे या शुक्रवारी (दि.९) सकाळी बहिणी रागिणी दोंदे यांच्या समवेत घरासमोरील अंगणात खुर्ची टाकून बसलेला असतांना हा अपघात झाला होता. शेजाऱ्याने आपले चारचाकी वाहन बाहेर काढण्यासाठी पाठीमागे घेतले असता चंद्रमोरे यांना धक्का लागला होता. या अपघातात जखमी झाल्याने त्यांना तात्काळ अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. दुपारी उपचार सुरू असतांना डॉ. शेखर चिरमोडे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणाचा तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.

भरधाव बुलेट ट्रकवर आदळल्याने तरुणाचा मृत्यू

नाशिक : भरधाव बुलेट पुढे जाणाऱ्या ट्रकवर जाऊन आदळल्याने १८ वर्षीय युवक ठार झाला हा अपघात जेलरोड भागात झाला. या अपघातात डबलसीट प्रवास करणारा मृत तरूणाचा मित्र जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार येसस शशीकुमार बेविरीचील (रा.निहार सोसा.शिवाजीनगर) असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत अंमलदार सचिन झाडे यांनी फिर्याद दिली आहे. बेविरीचील व अक्षय चंद्रकांत जगताप (२१) हे दोघे मित्र गेल्या २९ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास बुलेटवर डबलसीट प्रवास करत असतांना हा अपघात झाला. बिटको चौकाकडून जेलरोडच्या दिशेने ते प्रवास करीत असतांना भारत टायर वर्क्स दुकानासमोर भरधाव बुलेट पुढे जाणाऱ्या लाल रंगाच्या मालट्रकवर आदळली होती. या अपघातात दोघे मित्र गंभीर जखमी झाले होते. त्यातील चालक बेविरीचील याचा मृत्यू झाला असून दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. या गुह्याचा तपास हवालदार कुऱ्हाडे करत आहेत.

Comments

No comments yet.