काल नियुक्ती, आज तडकाफडकी राजीनामा... भाजपची चांगलीच कोंडी... नेमकं घडलं काय

Share:
Main Image
Last updated: 10-Jan-2026

बदलापूर, (प्रतिनिधी) १० जानेवारी - बदलापूर येथील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सह-आरोपी तुषार आपटे यांच्या 'स्वीकृत नगरसेवक' पदाच्या नियुक्तीवरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. त्यामुळेच काल नियुक्ती आणि आज तडकाफडकी राजीनामा देण्याची वेळ आपटे यांच्यावर आली आहे. या सर्व प्रकारामुळे भारतीय जनता पक्षाची मात्र मोठी नाचक्की आणि राजकीय कोंडी झाली आहे.

नेमके काय घडले?
कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाच्या वतीने तुषार आपटे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून काल घोषणा करण्यात आली होती. मात्र, आपटे हे बदलापूर प्रकरणातील संबंधित शाळा व्यवस्थापनाचे तत्कालीन सचिव असून, या प्रकरणात तक्रार नोंदवण्यास विलंब केल्याबद्दल त्यांच्यावर सह-आरोपी म्हणून गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचे गांभीर्य असतानाही त्यांना राजकीय पद दिल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. 

विरोधकांनी घेरले, भाजप बॅकफूटवर
या नियुक्तीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर टीकेची तोफ डागली.

"सह-आरोपीला संधी देऊन भाजपने असंवेदनशीलतेचा कळस गाठला आहे," अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाजपवर हल्ला चढवला.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तर "मुलींच्या सुरक्षिततेसाठी भाजपला मतदान करू नका," असे टोकाचे आवाहन केले.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. तर शिवसेना (उबाठा) नेते अंबादास दानवे यांनीही भाजपला लक्ष्य केले.

अखेर राजीनामा द्यावा लागला
विरोधकांचा वाढता दबाव आणि जनतेमधून उमटणाऱ्या तीव्र प्रतिक्रियेनंतर भाजप नेतृत्वाने तातडीने पावले उचलली. परिणामी, नियुक्ती झाल्याच्या २४ तासांच्या आतच तुषार आपटे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

काय आहे पार्श्वभूमी?
बदलापूरमधील बाल लैंगिक शोषण प्रकरणात शाळा व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल ४४ दिवसांनी आपटे यांना अटक करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर ४८ तासांत त्यांना जामीन मिळाला असला, तरी हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. अशा स्थितीत त्यांना सन्मानाचे पद देणे भाजपच्या अंगलट आले आहे.

Comments

No comments yet.