नाशिक, (प्रतिनिधी) १० जानेवारी - जेलरोड भागात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलाने गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. सदर मुलाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सिध्दांत हुकूमचंद अगोणे (रा.लक्ष्मीकृपा सोसा.म्हसोबा मंदिराजवळ जेलरोड) असे मृत मुलाचे नाव आहे. सिध्दांत परिसरातील नामांकित सेंट फिलोमिना शाळेत इयत्ता नववीत शिक्षण घेत होता. मनमिळावू आणि अतिशय हुशार असल्याने तो सर्वत्र परिचीत होता. शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी शाळेतून घरी परतल्यानंतर त्याने घरात कुणी नसतांना आपल्या बेडरूममध्ये पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला.
पालक कामावरून घरी परतल्यानंतर ही घटना समोर आली. सिद्धांतची आई महसूल विभागात ग्रामविकास अधिकारी तर वडील जिल्हा रूग्णालयात समाजसेवा अधिक्षक पदावर कार्यरत आहेत. त्याचा मोठा भाऊ राजस्थान येथील कोटा येथे शिक्षण घेत आहे. याबाबत संदिप शेजवळ यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हवालदार संदिप सानप करीत आहेत.