नागपूर, (प्रतिनिधी) १० जानेवारी - केंद्र सरकारने नव्या विमान कंपन्यांना परवानगी दिली, तरी प्रत्यक्षात त्यांचे काम सुरू होण्यासाठी मोठा काळ जाऊ शकतो, कारण विमानांची उपलब्धता ही सध्या सर्वात मोठी अडचण आहे, असे प्रतिपादन बोईंगचे माजी वरिष्ठ अधिकारी डॉ. दिनेश केसकर यांनी केले. भारतीय प्रबंध संस्थान (आयआयएम) नागपूर येथे आयोजित नेतृत्व संवाद कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांशी बोलत होते. डॉ. केसकर यांनी सांगितले की, सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर विमान उत्पादक कंपन्यांकडे २०३२ पर्यंतचे ऑर्डर बुक झाल्या आहेत.
“आज बोईंगकडे विमानासाठी ऑर्डर दिली, तरी त्याची डिलिव्हरी साधारण सहा वर्षांनंतरच मिळू शकते. त्यामुळे नव्या विमान कंपन्यांना लगेचच उड्डाणे सुरू करणे शक्य नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. देशातील विमान वाहतूक क्षेत्राबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, भारतात प्रवासी संख्येत झपाट्याने वाढ होत असली, तरी देशांतर्गत विमान निर्मिती सध्या शक्य नाही. विमाननिर्मितीसाठी सरकार परवागण्या आणि पायाभूत सुविधा देऊ शकेल, मात्र कुशल मनुष्यबळाची कमतरता ही मोठी अडचण असल्याचे त्यांनी सांगितले.
“जमीन, वीज आणि पाणी मिळू शकते, मात्र अत्यंत कुशल तंत्रज्ञ आणि अभियंते सहज उपलब्ध होत नाहीत. त्यामुळेच बोईंगची विमाननिर्मिती केंद्रे जगात केवळ दोनच असून ती अमेरिकेत आहेत,” असे ते म्हणाले. देशातील विमान वाहतूक बाजारात एका कंपनीचे वाढते वर्चस्व हीही चिंतेची बाब असल्याचे डॉ. केसकर यांनी नमूद केले. कोणत्याही क्षेत्रात एकाधिकार निर्माण झाल्यास त्याचे दुष्परिणाम दिसून येतात, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान त्यांनी जागतिक व्यापारस्थिती, भविष्यातील तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक विमानांबाबतही आपले विचार मांडले. तसेच अमरावतीतील आपले बालपण आणि व्हीएनआयटी नागपूर येथील शिक्षण यांचा उल्लेख करत विदर्भाशी असलेले आपले नाते व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांनी डॉ. केसकर यांचे स्वागत केले, तर कार्यकारी शिक्षण विभागाचे अधिष्ठाता प्रा. आलोक कुमार सिंह यांनी त्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला संस्थेचे प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.