नाशिक, (प्रतिनिधी) १० जानेवारी - तेलंगणाच्या वरंगळ पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यातील संशयित नाशिकमध्ये असल्याची खबर मिळताच, शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने त्यास भद्रकाली परिसरातून अटक केली आहे. संशयिताला तेलंगणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मोहम्मद मुनावर अली (४५, रा. निजामाबाद, तेलंगणा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. अली याच्याविरोधात तेलंगणातील वरंगळ सायबर पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कलमान्वये गुन्हा दाखल आहे.
मात्र गेल्या आठ महिन्यांपासून तो तेलंगणा पोलिसांना सापडत नव्हता. तेलंगणा पोलिसांना हुलकावणी देत तो चार दिवसांपूर्वी नाशिकमध्ये आला होता. वरंगळ पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणानुसार अली नाशिकमध्ये असल्याची खबर नाशिक शहर पोलिसांना दिली होती. त्यानुसार, गुन्हेशाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी युनिट दोनच्या पथकाला संशयित अलिचा शोध घेण्याचे आदेश दिले असता, प्रभारी सहायक निरीक्षक हेमंत तोडकर यांना अलीची खबर मिळाली.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे युनिट दोनचे उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, गुलाब सोनार, अतुल पाटील, मनोज परदेशी यांनी भद्रकाली परिसरामध्ये सापळा रचून अटक केली.
त्याची चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तेलंगणाचे वरंगळ पोलिसही नाशिकमध्ये दाखल झाले. अलीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.