कुंभमेळ्याची रंगीत तालीम नाशिकमध्ये या दिवशी, या ठिकाणी... प्रशासन आणि सरकार लागले झाडून कामाला...

Share:
Main Image
Last updated: 10-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १० जानेवारी - चांदवड तालुक्यातील मालसाने येथे 6 फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या णमोकार तीर्थ महोत्सवासाठी सर्व यंत्रणांनी प्रस्तावित कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांनी दिल्या. श्रीक्षेत्र णमोकार तीर्थ  येथे महोत्सव अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी आमदार. डॉ. राहुल आहेर,  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सहाय्यक जिल्हाधिकारी काश्मिरा संख्ये, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चारुदत्त शिंदे, उपविभागीय अधिकारी कैलास कडलग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे. तहसीलदार अनिल चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी बाळू पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री निकम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे, गट विकास अधिकारी मच्छिंद्र साबळे, चांदवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी दिनेश सिनारे,  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उप अभियंता एस जे गोमसे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी दीपक लोणे, सुमेरसिंग काले, ट्रस्टचे पदाधिकारी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले की, णमोकार तीर्थ महोत्सवाची सुरवात नाशिक जिल्ह्यातून होत असल्यामुळे कुंभमेळ्याच्या धर्तीवर या महोत्सवाला धार्मिक व पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक पातळीवर महत्व प्राप्त होणार आहे. नाशिकसाठी ही अभिमानास्पद बाब असून हा महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांसह सेवाभावी, धार्मिक संस्था व नागरिक यांचे योगदान आवश्यक आहे. हा महोत्सव 6 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 25 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. या काळात भाविक, पर्यटक व अति महत्त्वाच्या व्यक्ती येथे भेट देणार आहेत. यासाठी सर्व यंत्रणांनी व्यवस्था चोख राहील या दृष्टीने दक्ष राहावे. यासाठी यंत्रणांनी आवश्यक मनुष्यबळ वाढवून कामांना गती द्यावी. तीर्थाच्या ठिकाणी हेलिपॅडचे कामकाज, दर्शनी भागातील कुंपण भिंतकाम वेळेत पूर्ण करावे. यासह आकर्षक सुशोभीकरण, पर्यटक बोट व्यवस्था व आवश्यक परवानग्या, पार्किंगची व्यवस्था, गर्दीचे सुयोग्य नियोजन करावे. येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन पाणी, वीज, फिरती स्वच्छतागृहे, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व मैला व्यवस्थापन,  भाविक व पर्यटक निवास व्यवस्था करण्यात यावी. महोत्सव काळात  आरोग्य विभागाने भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता, हॉस्पीटल, तात्पुरते वैद्यकीय कक्ष, खाटा, औषधांसाठा, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी 24x 7  नियुक्त करण्याच्या सूचना डॉ.गेडाम यांनी दिल्या.

णमोकार तीर्थ महोत्सव यापुढे दरवर्षी सुरू राहणार असल्यामुळे याठिकाणी येणाऱ्या काळात कायमस्वरूपी दिर्घकालीन सोयी- सुविधा उपलब्धतेच्या दृष्टीने प्रशासान प्रयन्तशील असल्याचे जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले. 

बैठकीपूर्वी विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी तीर्थ ठिकाणी सुरू असलेले विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी आचार्य श्री देवनंदजी यांनी उपस्थितांना प्रबोधन केले तसेच णमोकार तीर्थ ठिकाणी महोत्सवाच्या दृष्टीने आवश्यक सेवा सुविधांबाबत चर्चा केली. 

चांदवड येथे रंगमहाल नूतनीकरणाच्या कामाची केली पाहणी
विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी चांदवड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी १८ व्या शतकात बांधलेल्या रंगमहाल या ऐतिहासिक वास्तूच्या नूतनीकरणाच्या कामाची पाहणी केली.यावेळी समवेत आमदार डॉ राहुल आहेर, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे, वास्तू विशारद विशारद तेजस्विनी आफळे, उपविभागीय अधिकारी कैलास कडलग, तहसीलदार अनिल चव्हाण, चांदवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी दिनेश सिनारे, नगराध्यक्ष वैभव बागुल, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, पोलीस निरीक्षक कैलास वाघ, रंगमहालाचे सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार, नगरसेवक प्रसाद सोनवणे उपस्थित होते. चांदवड तालुक्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकस होण्यासाठी आवश्यक उपायायोजनांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

Comments

No comments yet.