नाशिक, (प्रतिनिधी) १० जानेवारी - स्वत:च्या वापरासाठी आणि विक्रीसाठी आलेला तब्बल चार लाख रूपये किमतीचा मेफेड्रोन (एमडी) ड्रग्जचा साठा पोलिसांच्या हाती लागला आहे. या कारवाईत एका तस्करास बेड्या ठोकण्यात आल्या असून त्याने हा साठा मुंबई येथील एकाकडून खरेदी केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आकाश राजेंद्र ढाकणे (३१, रा. मोरया रो हाऊस, कोणार्क नगर, आडगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून, मुंबईतील कादिर शेख (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) या संशयिताच्या शोधार्थ पथक रवाना झाले आहे. कोणार्कनगर परिसरातील बालाजीनगर येथील मोरया रो हाऊस येथे मोठ्या प्रमाणावर एमडी ड्रग्ज तस्करीसाठी आल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सला मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी (दि.८) टास्क फोर्सच्या पथकाने सापळा रचून ढाकणे यास पकडले.
ढाकणे यास मुंबईतील जोगेश्वरी येथील कादिर शेख या संशयिताकडून आरोपीकडून चार लाख नऊ हजार रूपयांचे एमडी ड्रग्ज मिळाल्याचे पोलिस तपासात पुढे आले. टास्क फोर्सचे अंमलदार भास्कर चव्हाण यांनी दिलेल्या फियार्दीनुसार आडगाव पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास एनडीपीएस टास्क फोर्स करीत आहेत.
शहरात सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने मुंबईसह इतर ठिकाणाहून एमडी ड्रग्ज दाखल होते. पोलिसांकडून सातत्याने कारवाई होते. मात्र, तस्करीला पूर्ण आळा बसू शकलेला नाही. एमडी खरेदीदार कोण, किती दिवसांपासून तस्करीचे काम सुरू आहे, आदी प्रश्नाची उत्तरे टास्क फोर्समार्फत शोधण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.