नाशिक, (प्रतिनिधी) ९ जानेवारी - सातवीतील विद्यार्थीनीशी अश्लिल चाळे करणाऱ्या शिक्षकास जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना सन २०२३ मध्ये औद्योगिक वसाहतीतील अशोकनगर भागात घडली होती. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात बलात्कार विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गणेश राजेंद्र सोनवणे (३२ रा. शिवाजीनगर,सातपूर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत मोतीवाला कॉलेज भागात राहणाऱ्या पिडीतेच्या आईने फिर्याद दिली होती.
सातवीत शिक्षण घेणारी पिडीता आरोपीच्या अशोकनगर येथील चिंतामणी क्लासेस येथे शिकवणीस जात होती. क्लास सुटल्यानंतर मुलांना काढून देत आरोपीने झाडू मारण्याचा बहाणा करून मुलीस बदनामी करण्याची धमकी देत लैंगिक छळ केला. हा प्रकार १ ते ३ ऑगस्ट दरम्यान घडला होता. याबाबत मुलीने आपल्या घरी वाच्यता केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला होता. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुह्याचा तपास तत्कालिन उपनिरीक्षक श्याम सोनाजी जाधव यांनी करून पुराव्यानिशी दोषारोप न्यायालयात सादर केले होते. हा खटला कोर्ट क्रमांक ३ च्या जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन.पांढरे यांच्या कोर्टात चालला.
सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता भानूप्रिया पेटकर यांनी प्रभावी बाजू मांडली. त्यांना अभियोग कक्षाचे प्रभारी उपनिरीक्षक प्रदिप गायकवाड पैरवी अंमलदार मोनिका खरे व रंजना गायकवाड यांनी सहाय्य केले. न्यायालयाने फिर्यादी साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अधिकाऱ्यांनी सादर केलेले परिस्थीती जन्य पुराव्यास अनुसरून आरोपीस जन्मठेप आणि दीड हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.