नाशिक, (प्रतिनिधी) ९ जानेवारी - अकोला येथील अट्टल सायकल चोर शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ पथकाच्या हाती लागला आहे. संशयिताने शहरातून सुमारे दीड लाख रूपये किमतीच्या सतरा सायकली चोरल्याची कबुली दिली असून त्यास मुद्देमालासह अंबड पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
अर्जुन बेलप्पा वाणी (४४ मुळ रा.हिंदू धर्मशाळा रेल्वेस्टेशनजवळ अकोला हल्ली आदर्श लॉज सराफ बाजार ) असे अटक केलेल्या संशयित सायकल चोरट्याचे नाव असून त्याच्या विरूध्द नाशिक,जळगावसह बुलढाणा,अकोला व छत्रपती संभाजीनगर जिह्यात सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. युनिटचे सहाय्यक निरीक्षक डॉ. समाधान हिरे व हवालदार चंद्रकांत गवळी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. चोरीची इलेक्ट्रीक सायकल विक्रीसाठी चोरटा पाथर्डी फाटा येथील टोयोटा शोरूम भागात येणार असल्याच्य माहिती पथकाला मिळाली होती.
सापळा लावून पथकाने संशयिताच्या मुसक्या आवळल्या असून त्याने शहरातील वेगवेगळ्या भागातून तब्बल सतरा सायकली चोरी केल्याची कबुली दिली. सर्व सायकली जप्त करीत पथकाने त्यास मुद्देमाल अंबड पोलीसांच्या स्वाधीन केले आहे. ही कारवाई युनिटचे प्रभारी हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक डॉ. समाधान हिरे, उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, जमादार संजय सानप, हवालदार मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर,चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण, अंमलदार प्रविण वानखेडे, तेजस मते, जितेंद्र वजीरे आदींच्या पथकाने केली.