नाशिक, (प्रतिनिधी) ९ जानेवारी - नाशिकचा जलदगती गोलंदाज-अष्टपैलू रामकृष्ण घोष याने विजय हजारे ट्रॉफीत महाराष्ट्र संघाच्या शेवटच्या गोवा विरुद्धच्या साखळी सामन्यात गोवा संघास सामन्याच्या शेवटच्या षटकात विजयासाठी ६ धावांची आवशक्यता असताना निर्धाव षटक टाकत महाराष्ट्रास ५ धावांनी विजयी केले. विशेष म्हणजे गोव्याचा जम बसलेला फलंदाज ललित यादव नाबाद ५७ धावांवर खेळत असूनही रामकृष्णने आपल्या गोलंदाजीने हा विजय खेचून आणला.
प्रथम फलंदाजी करत महाराष्ट्राने ५ बाद २५ व ६ बाद ५२ अशा अतिशय खराब सुरूवाती नंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नाबाद १३४ व त्यास विकी ओस्तवालच्या ५३ धावांची मिळालेली साथ, या जोरावर ५० षटकांत ७ बाद २४९ धावा केल्या. गोवा संघाने विजयासाठी २५० धावांचा पाठलाग करताना ४९ षटकात ९ बाद २४४ धावा केल्या होत्या , पण रामकृष्ण घोषने डावातील शेवटचे ५० वे षटक टाकत निर्धाव महाराष्ट्रास ५ धावांनी विजयी केले. महाराष्ट्रातर्फे प्रशांत सोळंकीने सर्वाधिक ४ तर रामकृष्णनेही गोवा कर्णधार दीपरांज गांवकरला बाद करून महत्वाचा बळी मिळवला.
प्रथम श्रेणी क्रिकेटची अतिशय महत्त्वाची विजय हजारे ट्रॉफी ही एकदिवसीय मर्यादित ५० षटकांची स्पर्धा, नियमितपणे दरवर्षी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे आयोजित करण्यात येते. त्यात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात २४ डिसेंबर ते ८ जानेवारी दरम्यान जयपूर येथे महाराष्ट्र संघाचे साखळी सामने झाले. त्यात एलिट सी गटात महाराष्ट्र संघाचा चार विजयांसह पंजाब व मुंबई पाठोपाठ तिसरा क्रमांक लागला.
दरम्यान रामूच्या या कामगिरीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे व सर्व संबंधितांनी खास कौतुक केले आहे.