नाशिक, (प्रतिनिधी) ९ जानेवारी - ई चलनचा संदेश पाठवून सायबर भामट्यांनी शहरातील दोघांना तब्बल २६ लाख रूपयांना गंडविले आहे. संदेशासमवेत आलेली एपीके फाईल उघडताच नोकरदाराच्या बँक खात्यातून १८ लाख तर महिलेच्या खात्यातून ८ लाख रूपये अन्य खात्यात वर्ग करण्यात आले आहेत.
नोकरदाराने वेळीच धाव घेतल्याने ६ लाख रूपयांचा व्यवहार रोखण्यात पोलिसांना यश आले असून, याबाबत सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार खासगी नोकरी करतात. आर्थीक अडचण असल्यामुळे त्यांनी १८ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. ही रक्कम संबंधित बँकेने त्यांच्या बँक खात्यात वर्ग केली. यानंतर, काही तासांतच तक्रारदाराच्या व्हॉटसअॅपवर आरटीओ ई-चलन चा संदेश प्राप्त झाला. या संदेशासोबत एपीके फाईल जोडलेली होती. ही फाईल ओपन करताच सायबर भामट्यांनी तक्रारदाराच्या मोबाईलचा संपूर्ण रिमोट अॅक्सेस मिळवला.
त्यानंतर नेट बँकिंग, विविध बँकिंग अॅप्स तसेच ओटीपी व मेसेजेसचा ताबा घेत सहा वेगवेगळ्या आर्थिक व्यवहारांतून १८ लाख ३ हजार २४४ रुपये संशयास्पद खात्यांत वर्ग केले. काही वेळातच खात्यातील मोठी रक्कम गायब झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने सायबर पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी तत्काळ संबंधित बँकांशी संपर्क साधला.
वेळेत समन्वय साधल्याने १८ लाखांपैकी सुमारे ६ लाख रुपयांचे व्यवहार रोखण्यात यश आले. मात्र उर्वरित १२ लाख रुपयांची रक्कम आधीच वेगवेगळ्या खात्यांत वॉलेट्समार्फत वळवण्यात आल्याने ती रक्कम गमवावी लागली आहे. असाच प्रकार महिलेच्या बाबतीत घडला. महिलेस ई-चलनच्या नावाखाली एपीके लिंक पाठवून फसवण्यात आले. त्यांच्या खात्यातून सुमारे ८ लाख २ हजार ३१ रुपये परस्पर काढून घेण्यात आले आहेत.