पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथिओपियाच्या संसदेतील संयुक्त अधिवेशनाला केले संबोधित
Last updated: 20-Dec-2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथिओपियाच्या संसदेतील संयुक्त अधिवेशनाला केले संबोधित
नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इथिओपियाच्या संसदेत संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. इथिओपियाचा हा त्यांचा पहिलाच द्विपक्षीय दौरा आहे. त्यानिमित्त त्यांना अधिवेशनात भाषण करण्याचा विशेष सन्मान मिळाला.
भारतातील जनतेकडून इथिओपियाच्या संसद सदस्यांना मैत्री आणि सद्भावनेच्या शुभेच्छा देऊन पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. इथिओपियाच्या संसदेला संबोधित करणे ही एक मोठी विशेषाधिकाराची बाब आहे आणि लोकशाहीच्या या मंदिरातून इथिओपियातील शेतकरी, उद्योजक, महिला आणि देशाचं भविष्य घडवणारे तरुण अशा सामान्य जनतेशी संवाद साधण्याची संधी मिळणे ही मोठी गौरवाची गोष्ट आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
निशान हा इथिओपियाचा सर्वोच्च सन्मान दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी इथिओपियाच्या जनतेचे आणि सरकारचे आभार मानले. भारत आणि इथिओपियाचे जुने संबंध धोरणात्मक भागीदारीच्या स्तरावर पोहोचले असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.
भारत आणि इथिओपिया हे प्राचीन ज्ञान आणि आधुनिक महत्त्वाकांक्षेचा संगम आहेत असे मत मोदी यांनी व्यक्त केले. भारताच्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीतात आणि इथिओपियाच्या राष्ट्रगीतात भूमीला ‘माता’ म्हणून गौरवल्याची माहिती त्यांनी दिली.
दोन्ही देशांच्या सामायिक संघर्षाचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की 1941 मध्ये भारतातील सैनिकांनी इथिओपियाच्या स्वातंत्र्यासाठी स्थानिक योद्ध्यांसोबत खांद्याला खांदा लावून लढा दिला होता. इथिओपियाच्या जनतेच्या बलिदानाचे प्रतीक असलेल्या अदवा विजय स्मारकाला अभिवादन करण्याची संधी मिळणे ही त्यांच्यासाठी गौरवास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारत आणि इथिओपिया यांच्यातील भागीदारी अधिक व्यापक तसंच मजबूत करण्याबाबतची भारताची वचनबद्धता पंतप्रधानांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी इथिओपियाचा विकास व समृद्धीतील भारतीय शिक्षक व व्यावसायिकांच्या योगदानाची आठवण करुन दिली. डिजिटल पायाभूत सुविधा, अन्न सुरक्षा आणि नवोन्मेष या क्षेत्रातील भारताच्या प्रगतीविषयी माहिती देऊन त्यांनी इथिओपियाच्या प्राधान्यानुसार यापुढेही इथिओपियाला विकासामधे सहाय्य करायला भारत तयार असल्याचे सांगितले. वसुधैव कुटुम्बकम या आपल्या तत्त्वानुसार भारत मानवतेसाठी मदत करायला सदैव तयार आहे असे मोदी म्हणाले. कोविड साथीच्या काळात भारत इथिओपियाला लस पुरवठा करू शकला ही भारताच्या दृष्टीने विशेष बाब आहे असे त्यांनी नमूद केले.
भारत आणि इथिओपिया या दक्षिण गोलार्धातील देशांनी विकसनशील देशांच्या कल्याणासाठी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे, या मुद्दयावर पंतप्रधानांनी भर दिला. दहशतवादाविरुद्धची लढाई मजबूत करण्यात साथ दिल्याबद्दल त्यांनी इथिओपियाचे आभार मानले.
अफ्रिकन देशांच्या ऐक्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यामधे अफ्रिकन संघाचे मुख्यालय असलेल्या आदिस अबाबाची भूमिका महत्त्वाची आहे असे अधोरेखित करुन पंतप्रधान म्हणाले की, जी 20 देशांच्या अध्यक्षपदाच्या काळात अफ्रिकन संघाचा जी 20 समुहात समावेश करता आला, याचा भारताला अभिमान आहे. आपल्या सरकारच्या 11 वर्षांच्या कार्यकाळात भारत आणि अफ्रिकेतील सहकार्याचे संबंध कित्येक पटींनी वृद्धींगत झाले आणि दोन्ही देशांच्या राज्य आणि केंद्र सरकारमधील प्रमुख नेत्यांचे 100 पेक्षा जास्त दौरे आयोजित करण्यात आले. अफ्रिकेच्या विकासाप्रती भारताच्या वचनबद्धतेचा उल्लेख त्यांनी केला. जोहानसबर्ग इथे झालेल्या जी 20 शिखर परिषदेतील ‘अफ्रिका कुशलता वृद्धी उपक्रम’ हा अफ्रिका खंडातील लाखो लोकांना प्रशिक्षित करण्याबाबतचा आपला प्रस्ताव त्यांनी पुन्हा सादर केला.
Comments
No comments yet.