नाशिक, (प्रतिनिधी) दि. .९ जानेवारी २०२६ :- राज्याचे अन्न, औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे स्टार प्रचारक तथा माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भुजबळ फार्म येथील कार्यालयात युवक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. या युवक कार्यकर्त्यांनी प्रभाग क्रमांक २४ ड मधील राष्ट्रवादीचे उमेदवार अमर वझरे यांना पाठींबा जाहीर केला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी बाळासाहेब गीते, मकरंद सोमवंशी, सुनील आहिरे, रवींद्र शिंदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.
नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ ड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार अमर वझरे यांना युवकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून, हा पाठिंबा पक्षाच्या ताकदीत भर घालणारा ठरत आहे. युवकांमध्ये अमर वझरे यांच्या सामाजिक कार्याची, सर्वसामान्यांशी असलेली थेट नाळ आणि विकासाभिमुख भूमिका यामुळे मोठा विश्वास निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज मंत्री नरहरी झिरवाळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत तुषार तेजाळे, प्रथमेश तेजाळे, यश दिक्षित, लक्ष्मण केदार, कल्पेश वाघ यांच्यासह अनेक युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत अधिकृत प्रवेश केला.
याप्रसंगी मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, “युवक हा देशाचा आणि लोकशाहीचा कणा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवकांना केवळ आश्वासने देत नाही, तर त्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेते. अमर वझरे यांच्यासारखा अभ्यासू, प्रामाणिक आणि जनतेत मिसळलेला उमेदवार प्रभाग २४ ड साठी निश्चितच योग्य पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनी युवकांच्या प्रवेशाचे स्वागत करताना सांगितले की, प्रभाग २४ ड मधील युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे वाढता ओढा हा अमर वझरे यांच्या कार्याची पोचपावती आहे. येणाऱ्या निवडणुकीत युवकांची ताकद निर्णायक ठरेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येथे निश्चित विजय मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
युवकांचा वाढता पाठिंबा आणि संघटनात्मक बळ पाहता, प्रभाग क्रमांक २४ ड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बाजू अधिक मजबूत होत असून, अमर वझरे यांची उमेदवारी जनतेतून मोठा प्रतिसाद मिळवत आहे.