नंदुरबार, (प्रतिनिधी) ९ जानेवारी - नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमधील वाळंबा येथे प्रथमच ब्रोकली या उच्च मूल्याच्या भाजीपाला पिकाची यशस्वी लागवड करण्यात आली आहे. या अभिनव प्रयोगामुळे सातपुडा भागातील शेती क्षेत्रात नवा इतिहास घडत असून, शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी एक महत्त्वाची संधी निर्माण झाली आहे. या उपक्रमास डॉ. हेडगेवार सेवा समिती संचलित कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांचे मोलाचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले आहे.
पारंपरिक पिकांपुरती मर्यादित असलेली शेती आधुनिक व बाजारपेठेत मागणी असलेल्या पिकांकडे वळावी, तसेच सातपुडा भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, या उद्देशाने हा प्रयोग राबवण्यात आला. कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली योग्य रोपांची निवड, शास्त्रीय खत व्यवस्थापन, नियोजनबद्ध पाणीपुरवठा तसेच कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजनांचा अवलंब करून ब्रोकलीची लागवड करण्यात आली आहे.
उद्यानविद्या तज्ञ डॉ. वैभव गुर्वे यांनी सांगितले की, वाळंबा परिसरातील मातीची रचना, सुपीकता आणि थंड व समतोल हवामान ब्रोकली पिकाच्या वाढीस अत्यंत अनुकूल आहे. योग्य तांत्रिक मार्गदर्शन मिळाल्यास या भागात ब्रोकलीसारख्या उच्च मूल्याच्या व निर्यातक्षम भाजीपाला पिकांचे दर्जेदार उत्पादन घेता येऊ शकते.
सध्या ब्रोकोली पिकाची वाढ जोमात असून फुलांची गुणवत्ता समाधानकारक आहे. स्थानिक तसेच शहरी बाजारपेठेत ब्रोकलीला मोठी मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात चांगला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. या यशस्वी प्रयोगामुळे सातपुडा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला असून, पुढील काळात फ्लॉवर, कोबी, लेट्यूस यांसारख्या आधुनिक भाजीपाला पिकांकडे शेतकरी वळण्याची चिन्हे दिसत आहेत.
वाळंबा येथे झालेली ब्रोकोलीची यशस्वी लागवड ही केवळ एक प्रयोग नसून, सातपुड्यातील शेतीच्या उज्ज्वल व शाश्वत भविष्याची सुरुवात असल्याचे मत कृषी तज्ञांनी व्यक्त केले आहे.