नाशिक, (प्रतिनिधी) ९ जानेवारी - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे सक्रिय पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते किरण पानकर यांनी आज माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक ३ मधील राष्ट्रवादी–शिवसेना युतीची ताकद अधिक बळकट झाली आहे.
या प्रसंगी किरण पानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी–शिवसेना युतीच्या प्रभाग क्रमांक ३ मधील अधिकृत उमेदवारांना जाहीर पाठिंबा देत, येणाऱ्या महापालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने युतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी कार्य करणार असल्याची स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, लोकहिताचे, विकासाभिमुख व सर्वसामान्यांना न्याय देणारे राजकारण करण्याची दिशा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दाखवली असून, याच विचारधारेशी बांधील राहून आपण हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनी किरण पानकर यांचे पक्षात स्वागत करताना सांगितले की, प्रामाणिक कार्यकर्ते, समाजाशी जोडलेले नेतृत्व आणि तरुणांची ताकद हीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची खरी शिदोरी आहे. किरण पानकर यांच्या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक ३ मध्ये युतीला मोठे बळ मिळाले असून, येत्या निवडणुकीत युतीचे उमेदवार निश्चितपणे विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक ३ मध्ये शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस युतीची संघटनात्मक ताकद वाढली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक विकास, नागरी सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता व मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत युतीचे उमेदवार सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करतील, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
या यावेळी प्रभाग तीनचे उमेदवार अंबादास खैरे, सुनिता शिंदे, हर्षल पटेल, पुनम मोगरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.