नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ८ जानेवारी - वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या तंत्रज्ञान हस्तांतरण सोहळ्यातील शेतातल्या टाकाऊ अवशेषांपासून ते रस्त्यापर्यंत: पायरोलिसिसच्या माध्यमातून बायो-बिटुमेन या सत्राला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज संबोंधित केले. शेतीतील अवशेषांचे कशारितीने एका मौल्यवान राष्ट्रीय साधन संपत्तीत रूपांतर केले जाऊ शकते ही बाब त्यांनी आपल्या संबोधनात अधोरेखित केली. बायो-बिटुमेन म्हणजे विकसित भारत 2047 या संकल्पपूर्तीच्या दिशेने टाकलेले एक क्रांतिकारी पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतीतील टाकाऊ अवशेषांचा वापर केला, तर पिके जाळल्यामुळे होणारे प्रदूषण कमी होईल आणि चक्रीय अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असे ते म्हणाले. 15% मिश्रित केले तर भारताची सुमारे 4,500 कोटी रुपये इतकी परकीय चलनाची बचत होईल, त्याचबरोबर देशाचे कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्वही लक्षणीयरीत्या कमी होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.
बायो-बिटुमेनचे व्यावसायिक उत्पादन करणारा भारत हा जगातील पहिला देश बनला आहे, आणि यामुळेच आजचा दिवस भारताच्या रस्ते पायाभूत सुविधा क्षेत्रातील हा एक ऐतिहासिक मैलाचा दगड ठरला आहे असे ते म्हणाले. या यशाबद्दल त्यांनी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद आणि तिथल्या समर्पित शास्त्रज्ञांचे अभिनंदनही केले. हे यश साध्य करण्यासाठी सतत पाठबळ दिल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांचेही गडकरी यांनी आभार मानले.
या शोधामुळे शेतकऱ्यांचे सक्षमीकरण होईल, ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला. बायो-बिटुमेनच्या या यशातून शाश्वत विकास, आत्मनिर्भरता आणि पर्यावरणाप्रती उत्तरदायी विकासाबाबतची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारची वचनबद्धता दिसून येते, यामुळे देशाच्या स्वच्छ आणि हरित भविष्याचा मार्गही प्रशस्त होणार आहे असे ते म्हणाले.