नाशिककरांनो, सावधान! या ठिकाणी वाहतूक नियम मोडाल तर...

Share:
Main Image
Last updated: 08-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ८ जानेवारी - रस्ता सुरक्षा वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या उद्देशाने मोबाईल वाहतूक अंमलबजावणी प्रणाली (MTES- रडार यंत्रणा) प्रकल्प राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात 3 इंटरसेप्टर वाहनांद्वारे  के. के. वाघ कॉलेज, नाशिक, वाडीवऱ्हे ते जैनमंदिर (मुंबई-नाशिक रोड) व शिंदे टोलनाका (नाशिक- पुणे रोड) या ठिकाणी ही प्रणाली कार्यान्वित होणार असून जिल्ह्यातील नागरिकांनी वाहतूक नियामांचे पालन करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

या प्रणाली अंतर्गत परिवहन विभागामार्फत नव्याने खरेदी केलेल्या इंटरसेप्टर वाहनांमध्ये प्रगत मोबाईल सर्व्हिलन्स प्रणालीचा (MTES- रडार यंत्रणा) वापर करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन धारकांवर कारवाई करण्यात येते. नाशिक जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्र, महामार्ग, नाशिक शहरातील अंतर्गत रस्त्यांवर  तसेच आवश्यक असलेल्या ठिकाणी रडार यंत्रणेच्या वाहनांद्वारे एकाच वेळेस ४ प्रकारच्या  वाहतूक नियामांचे उल्लंघन शोधण्यास मदत होत आहे.

यात प्रामुख्याने वेगमर्यादेचे उल्लंघन करणे, हेल्मेट व सीटबेल्टचा (वाहन चालक व सह प्रवासी) वापर न करणे,  मोटार सायकलवर ट्रीपलसीट वाहन चालविणे, मोटार वाहन कायद्याने ठरविलेली नंबरप्लेट  न लावता वाहन चालविणे तसेच वाहनाची वैध कागदपत्रे नसताना वाहन चालविणे बाबतची तपासणी करण्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येते. या नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन धारक व चालकावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती गुंड यांनी कळविले आहे.

Comments

No comments yet.