नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ८ जानेवारी - इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरध्वनीवरून संवाद साधला.
दोन्ही नेत्यांनी एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.त्यांनी दोन्ही देशांच्या जनतेला शांती व समृद्धीच्या सदिच्छा दिल्या.
लोकशाही मूल्ये,परस्पर विश्वास आणि दूरदृष्टी यांच्या आधारावर भारत-इस्रायल भागीदारी मजबूत करण्यासाठी त्यांनी समान उद्दिष्टे निश्चित केली.
त्यांनी सर्व प्रकारच्या आणि स्वरूपातील दहशतवादाविरुद्ध शून्य-सहनशीलतेच्या दृष्टिकोनाचा आणि दहशतवादाविरुद्ध लढण्याच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला.
नेतन्याहू यांनी गाझा शांतता योजनेच्या अंमलबजावणीबद्दल मोदी यांना माहिती दिली. या प्रदेशात न्याय्य आणि शाश्वत शांततेसाठीच्या प्रयत्नांना भारताचा सातत्यपूर्ण पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला.
त्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक विषयांवरही विचारांची देवाणघेवाण केली.
परस्परांच्या संपर्कात राहण्याला दोन्ही नेत्यांनी संमती दर्शविली.