चला तोरणमाळ महोत्सवाला... आदिवासी संस्कृती आणि पर्यटनाचा अनोखा संगम पाहायला मिळणार...

Share:
Main Image
Last updated: 08-Jan-2026

तोरणमाळ, नंदुरबार (प्रतिनिधी) ८ जानेवारी - तोरणमाळ या निसर्गसंपन्न पर्यटनस्थळी पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी तोरणमाळ महोत्सवाच्या आयोजनाबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक आज पार पडली. या बैठकीत तीन दिवसीय तोरणमाळ महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा महोत्सव दिनांक 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.

या महोत्सवाच्या माध्यमातून तोरणमाळची नैसर्गिक संपदा, आदिवासी संस्कृती आणि स्थानिक उपजीविकेचे दर्शन घडविण्यात येणार आहे. महोत्सवात आदिवासी संस्कृतीचे सादरीकरण व प्रदर्शन, पारंपरिक नृत्य, कला, हस्तकला तसेच लोकजीवनाची ओळख करून देण्यात येणार आहे. यासोबतच पर्यटकांसाठी तोरणमाळ परिसरातील प्रमुख पर्यटन स्थळांचे भ्रमण आयोजित करण्यात येणार आहे.

पर्यटनाला अधिक आकर्षक स्वरूप देण्यासाठी साहसी पर्यटन उपक्रमांतर्गत झिप लाईन व ट्रेकिंग यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातून खानपान स्टॉल्स उभारण्यात येणार असून, स्थानिक व पारंपरिक पदार्थांचा आस्वाद पर्यटकांना घेता येणार आहे.

या महोत्सवामुळे स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन आर्थिक व शाश्वत विकासाला चालना मिळणार आहे. पर्यटन, हस्तकला, साहसी उपक्रम आणि खानपान क्षेत्रात ग्रामस्थांचा थेट सहभाग वाढणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.

महोत्सव यशस्वीपणे राबविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून सविस्तर आराखडा सादर करण्याच्या सूचना माननीय जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देण्यात आल्या.

आदिवासी संस्कृतीचा सन्मान, पर्यटनाचा विकास आणि रोजगारनिर्मितीचा संकल्प घेऊन आयोजित होणारा हा तोरणमाळ महोत्सव सर्वांसाठी लाभदायक ठरेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Comments

No comments yet.