चार वर्षांपासून दुरावलेले पती-पत्नी पुन्हा एकत्र.... राष्ट्रीय लोक अदालतीत हे सगळं घडलं...
Last updated: 20-Dec-2025
अहिल्यानगर, (प्रतिनिधी) दि. १६ डिसेंबर - अर्जदार व सामनेवाला यांचा विवाह दि. १३ नोव्हेंबर २०१८ रोजी झाला होता. सन २०२० व २०२१ मध्ये त्यांना दोन कन्यारत्ने प्राप्त झाली. संसार सुरू असताना छोट्या-मोठ्या कुरबुरी होत राहिल्या. त्यातून गैरसमज वाढत गेले आणि सन २०२१ पासून दोघेही वेगवेगळे राहत होते. परस्परांतील मतभेद अधिक तीव्र झाल्याने संबंधित दोन प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
ही दोन्ही प्रकरणे दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. यावेळी पॅनल प्रमुख एल. एस. पाढेन व श्रीमती जे. डी. उपरकर, तसेच अर्जदारांच्या विधीज्ञ अॅड. आशा गोंधळे आणि सामनेवाल्यांच्या विधीज्ञ अॅड. सौ. सुजाता पंडित यांनी दोन्ही पक्षकारांचे योग्य समुपदेशन केले.
समुपदेशनानंतर दोन्ही पक्षकारांनी आपल्या दोन मुलींच्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करून परस्पर समझोता करण्यास सहमती दर्शविली. परिणामी, चार वर्षांपासून दुरावलेले पती-पत्नी राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून पुन्हा एकत्र आले असून, आज ते आपल्या मुलींसह एकत्र राहण्यास गेले आहेत.
राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून कौटुंबिक वाद सौहार्दपूर्णरीत्या निकाली काढण्याचा हा उपक्रम समाजात सलोखा व कौटुंबिक एकोपा वाढविण्यास निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे.
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ३९ हजार २५४ प्रकरणे निकाली; ४६ कोटी ५२ लाख रुपयांची वसूली
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा महाराष्ट्रात चौथा क्रमांक
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहिल्यानगर बार असोसिएशन व सेंट्रल बार असोसिएशन, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय, तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत संपन्न झाली. या लोकअदालतीमध्ये ३९ हजार २५४ इतकी प्रकरणे निकाली निघून ४६ कोटी ५२ लाख ६८ हजार ५८८ रुपयांची वसूली करण्यात आली. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा राज्यात चौथा क्रमांक आला असल्याची माहिती जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांनी दिली.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकअदालत यशस्वीरित्या संपन्न झाली. सर्व न्यायालयांतील दिवाणी व फौजदारी प्रकरणे, धनादेश (चेक) संदर्भातील प्रकरणे, बँकेची कर्ज वसूली प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कामगार न्यायालयांतील प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, वीज महावितरणाची समझोता योग्य प्रकरणे तसेच न्यायालयात येण्याअगोदरची दाखलपूर्व प्रकरणे आपसातील समझोत्यासाठी या लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्ह्यातील ३६ हजार ९१७ दाखलपूर्व प्रकरणे मिटविण्यात आली, तर २ हजार ३३७ प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. विशेष मोहिमेमध्ये १ हजार १८१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. लोकअदालतीमध्ये ४६ कोटी ५२ लाख ६८ हजार ५८८ इतक्या रकमेची वसूली झाली आहे. आजपर्यंत झालेल्या सर्व लोकअदालतींपेक्षा या लोकअदालतीमध्ये अधिक प्रकरणे निकाली काढण्यात आली.
Comments
No comments yet.