नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ८ जानेवारी - दिल्ली विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भगतसिंग यांनी १९२९ मध्ये सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये 'बहिऱ्या ब्रिटिश सरकारला' जागे करण्यासाठी बॉम्ब फेकला होता, मात्र मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात ब्रिटिशांऐवजी 'बहिऱ्या काँग्रेस सरकार' असा उल्लेख केल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
नक्की काय घडले?
मंगळवारी विधानसभेत मुख्यमंत्री रेखा गुप्ता दिल्लीच्या इतिहासाचा आणि क्रांतीचा गौरव करत होत्या. यावेळी त्यांनी १९२९ च्या ऐतिहासिक घटनेचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या, "दिल्लीने भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची ती क्रांती पाहिली आहे, जेव्हा त्यांनी 'बहिऱ्या काँग्रेस सरकार' विरोधात बॉम्ब फेकला होता." प्रत्यक्षात इतिहासानुसार, भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी तो बॉम्ब तत्कालीन ब्रिटिश राजवटीच्या निषेधार्थ फेकला होता.
विरोधकांकडून 'इतिहास' दुरुस्त करण्याचा सल्ला
आम आदमी पार्टी (AAP) आणि काँग्रेसने या विधानावरून मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. 'आप'चे नेते सौरभ भारद्वाज यांनी सोशल मीडियावर या भाषणाचा व्हिडिओ शेअर करत म्हटले की, "आज मुख्यमंत्र्यांनी इतिहासाची एक नवीन आवृत्ती सादर केली आहे. शालेय मुलांनाही माहित आहे की भगतसिंग ब्रिटिशांविरुद्ध लढले होते, पण मुख्यमंत्र्यांच्या मते त्यांनी काँग्रेसवर बॉम्ब फेकला होता. हा देशाचा आणि हुतात्म्यांचा अपमान आहे."
सोशल मीडियावर चर्चा आणि टीका
हे विधान समोर आल्यानंतर सोशल मीडियावर 'History in Remix Mode' अशा हॅशटॅगसह मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली जात आहे. भाजपने ही केवळ एक 'जीभेची घसर' असल्याचे म्हटले असले, तरी विरोधकांनी मात्र हा मुद्दा लावून धरला असून मुख्यमंत्र्यांनी या चुकीबद्दल माफी मागावी, अशी मागणी केली आहे.