शाळेत मुलांना सोडायला जाणाऱ्या आईची भामट्याकडून छेड..

Share:
Last updated: 07-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ७ जानेवारी - एकतर्फी प्रेमातून विवाहितेचा पाठलाग करणाऱ्यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. प्रेमास नकार दिल्याने संशयिताने दोन्ही मुलांचे अपहरण करून इजा पोहचविण्याची धमकी दिल्याने महिलेने पोलिसात धाव घेतली असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृष्णा सोनाजी गोरे (२५ रा.खंडेरावनगर,पाथर्डी फाटा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पिडीत विवाहीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार तिचे लहान मुले सिडकोतील अश्विननगर भागात असलेल्या नामांकित शाळेत शिक्षण घेतात. मुलांना शाळेतून ने आण करतांना संशयित गेल्या जून महिन्यापासून पिडीतेचा पाठलाग करीत होता. मात्र महिलेने त्याच्याकडे कानाडोळा केला. अनेकवेळा भेटून त्याने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला परंतु रोजच मुलांना सोडण्यासाठी यावे लागत असल्याने तिने दुर्लक्ष केले. महिलेकडून कुठलाही प्रतिसाद नसल्याने अखेर संशयिताने सोमवारी (दि.५) तिची वाट अडवित मैत्रीसाठी आग्रह धरला. यावेळी महिलेने त्यास सुनावले असता त्याने थेट मुलांचे अपहरण करून इजा पोहचविण्याची धमकी दिल्याने हा प्रकार पोलिसात पोहोचला असून तपास हवालदार ठुबे करीत आहेत.

जुन्या वादातून तरुणावर धारदार कोयत्याने हल्ला

नाशिक - जुन्या वादाची कुरापत काढून एका सराईताने तरुणावर धारदार कोयत्याने वार केल्याची घटना मेहरधाम भागात घडली. या घटनेत युवक जखमी झाला असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश शेलार (रा.मेहरधाम पेठरोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून तो पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. याबाबत मयुर रत्नाकर पाचोरे (रा.विष्णूप्रिया सोसा.मेहरधाम) या तरूणाने फिर्याद दिली आहे. पाचोरे मंगळवारी (दि.६) सायंकाळच्या सुमारास रामसागर स्विट दुकाना समोर आतिष कटारे व रोहित पताडे या मित्रांसमवेत गप्पा मारत उभा असतांना ही घटना घडली. संशयितांनी तिघा मित्रांना गाठून पाचोरे यास मागील भांडाची कुरापत काढून शिवीगाळ केली. या घटनेत संतप्त संशयिताने पाचोरे याच्यावर धारदार हल्ला केल्याने तो जखमी झाला आहे. या घटनेचा तपास हवालदार गवारे करीत आहेत.

ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय करणाऱ्या दोघांना मारहाण; आरोपींमध्ये माय-लेकींचा समावेश

नाशिक - ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणाऱ्या दोघा भावांना एका कुटूंबियांनी बेदम मारहाण केल्याची घटना पेठरोड भागात घडली. या घटनेत एकाच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोनसाखळी तुटून गहाळ झाली असून त्याचा मोबाइल फोडून नुकसान करण्यात आले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात मायलेकींचा समावेश आहे.

अंकुश आव्हाड, कृष्णा आव्हाड, संगीता आव्हाड आणि त्यांची मुलगी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत सचिन दत्तात्रेय लोखंडे (रा.दुर्गा नगर आरटीओ जवळ) यांनी फिर्याद दिली आहे. लोखंडे यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून पेठरोडवरील शरदचंद्र गेटच्या प्रवेशद्वारावर त्यांचे अर्जवी ट्रान्सपोर्ट नावाचे कार्यालय आहे. सचिन लोखंडे व संदिप लोखंडे हे दोघे भाऊ सोमवारी (दि.५) आपला व्यवसाय सांभाळत असतांना ही घटना घडली. दुपारच्या सुमारास कार्यालयात शिरलेल्या संशयितांनी कुठलेही कारण नसतांना सचिन लोखंडे यांना शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. यावेळी सचिन लोंखंडे हा आपल्या भावाच्या मदतीस धावून गेला असता त्यालाही संशयितांनी मारहाण केली. या घटनेत सचिन लोखंडे यांचा मोबाईल फोडण्यात आला असून त्यांच्या गळ््यातील सोनसाखळी तुटून गहाळ झाली आहे. तपास उपनिरीक्षक कैलास जाधव करीत आहेत.

Comments

No comments yet.