नाशिक, (प्रतिनिधी) ७ जानेवारी - नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी नाशिक शहरात आज शिवसेनेचे भव्य शक्तीप्रदर्शन संपन्न झाले. मा. खा. श्रीकांतजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेली ही प्रचार रॅली (रोड शो) प्रचंड उत्साह, जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडली.
नाशिकच्या ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेला साजेसा प्रारंभ म्हणून प्राचीन श्री काळाराम मंदिर येथे विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर शिवसेनेच्या प्रचार रॅलीस प्रारंभ झाला.
हा भव्य रोड शो हिरावाडी, म्हसरूळ, पंचवटी कारंजा, शालिमार, नाशिकरोड, मुक्तिधाम, जेलरोड तसेच टाकळी या प्रमुख भागांतून मार्गक्रमण करत पार पडला. रस्त्यांच्या दुतर्फा जमलेले नागरिक, शिवसैनिकांचा उत्साह, भगवे झेंडे आणि घोषणांनी संपूर्ण नाशिक शहर शिवसेनामय झाले होते.
यानंतर टाकळी येथे आयोजित जाहीर सभेत खा. श्रीकांत शिंदे यांनी नाशिक महानगरपालिकेच्या निवडणूक रणांगणात उतरलेल्या शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. नाशिक शहराच्या विकासासाठी, सक्षम प्रशासनासाठी आणि जनहिताच्या कामांसाठी शिवसेनाच योग्य पर्याय असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या संपूर्ण कार्यक्रमास शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, युवक, महिला तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.