नाशिक, (प्रतिनिधी) दि.७ जानेवारी २०२६ - नाशिक महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, प्रभाग क्रमांक ३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास हिराबाई जगन्नाथ खैरे यांच्या प्रचार रॅलीला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. "नम्रता, कार्यकुशलता आणि प्रगतीचा वारकरी" अशी ओळख असलेल्या अंबादास खैरे यांच्या समर्थनार्थ संपूर्ण प्रभाग एकवटल्याचे चित्र आज पाहायला मिळाले.
डॉ. शेफाली भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती
या रॅलीचे मुख्य आकर्षण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या डॉ. शेफाली भुजबळ यांची उपस्थिती. त्यांनी या रॅलीत सहभागी होत अंबादास खैरे यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. खैरे यांच्यासारखा सामाजिक भान असलेला तरुण लोकप्रतिनिधी म्हणून महापालिकेत जाणे शहराच्या विकासासाठी गरजेचे असल्याचे मत यावेळी डॉ. भुजबळ यांनी व्यक्त केले.
महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांकडून आशीर्वाद
प्रचार रॅली गणेशवाडी येथून सुरू होऊन काट्या मारुती परिसर, हिरावाडी रोड, गोपाळ नगर, कमलनगर, केवडीबन, स्वामी नारायण नगर, टकले नगर आणि सावरकर नगर या भागांत फिरली. ठिकठिकाणी महिलांनी अंबादास खैरे यांचे औक्षण करून विजयाचा टिळा लावला. ज्येष्ठ नागरिकांनी अत्यंत आपुलकीने त्यांचे स्वागत करत डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला.
तरुणांचा 'युवा जल्लोष'
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष असल्याने अंबादास खैरे यांच्या रॅलीमध्ये तरुणांचा मोठा घोळका सहभागी झाला होता. "अंबादास खैरे पुढे चला, आम्ही तुमच्या सोबत आहोत," अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. त्रिमुर्ती नगर सांस्कृतिक, कला व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची पावती आजच्या गर्दीतून स्पष्टपणे दिसून आली.
प्रभाग ३ च्या सर्वांगीण विकासाचा निर्धार
सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या अंबादास खैरे यांनी यावेळी मतदारांशी संवाद साधला. "प्रभागाचा विकास हाच माझा ध्यास आहे. प्रभाग ३ मधील रस्ते, पाणी आणि आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे," असा शब्द त्यांनी नागरिकांना दिला. खैरे यांच्या रूपाने एक 'दूरदृष्टी' असलेला उमेदवार मिळाल्याने प्रभागातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
प्रचार रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीचे चारही उमेदवार उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनिता सचिन शिंदे, अंबादास जगन्नाख खैरे आणि शिवसेनेचे पुनम दिगंबर मोगरे आणि हर्षल नंदलाल पटेल या चारही उमेदवारांनी नागरिकांना अभिवादन केले. परिसरातील रहिवाशांनी त्यांचे उत्स्फुर्त स्वागत केले. यावेळी युतीच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला होता.