नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ७ जानेवारी - केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज टोयोटा मिराई या फ्युएल सेल इलेक्ट्रिक वाहनातून (FCEV) एकत्र प्रवास केला.
देशात हरित हायड्रोजन आणि स्वच्छ गतिशीलतेला प्रोत्साहन देण्याप्रति सरकारची वचनबद्धता अधोरेखित करत,प्रल्हाद जोशी यांनी भारत मंडपमपासून नितीन गडकरी यांच्या निवासस्थानापर्यंत 'मिराई' गाडीचे सारथ्य केले.
टोयोटा मिराई विषयी
टोयोटा ‘मिराई’ हे दुसऱ्या पिढीचे हायड्रोजन फ्युएल सेलवर चालणारे - इलेक्ट्रिक वाहन (FCEV) आहे, ज्यात हायड्रोजन आणि ऑक्सिजनमधील रासायनिक अभिक्रियेद्वारे वीज निर्माण केली जाते आणि यातून केवळ पाण्याची वाफ उत्सर्जित केली जाते. सुमारे 650 किमी इतकी ड्रायव्हिंग रेंज तसेच पाच मिनिटांपेक्षा कमी वेळेत इंधन भरण्याच्या सुविधेमुळे, हे जगातील सर्वात प्रगत आणि कार्यक्षम शून्य-उत्सर्जन गतिशीलतेच्या उपायांपैकी एक ठरले आहे.