नाशिक, (प्रतिनिधी) दि.७ जानेवारी २०२६:- नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक २ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने उच्चशिक्षित उमेदवार ऐश्वर्या जेजूरकर यांनी आपल्या प्रचाराचा झंझावात सुरू केला आहे. "एकच ध्यास, शाश्वत विकास" हे ब्रीदवाक्य घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या ऐश्वर्या जेजूरकर यांनी प्रभागाच्या पर्यावरणपूरक आणि आधुनिक विकासासाठी आपला विशेष 'व्हिजन प्लॅन' मांडला आहे.
पर्यावरण आणि वृक्षारोपणावर विशेष भर प्रभाग २ चा परिसर हा नैसर्गिकदृष्ट्या संपन्न आहे. हा वारसा जपण्यासाठी आणि प्रभाग अधिक सुंदर करण्यासाठी त्यांनी खालील संकल्प मांडले आहेत:
देशी झाडांची लागवड: प्रभागातील सर्व उद्यानांमध्ये केवळ परदेशी शोभेची झाडे न लावता, पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या 'देशी' वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाईल.
हरित चौक आणि दुभाजक: परिसरातील प्रमुख चौक आणि रस्ते दुभाजकांमध्ये सुंदर झुडुपांची लागवड करून शहराच्या सौंदर्यात भर घातली जाईल.
बांबू लागवड मोहीम: उद्याने आणि मोकळ्या भूखंडांचा वापर करून त्या ठिकाणी बांबूची लागवड करण्यात येईल, ज्यामुळे ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होईल.
गोदावरी संवर्धन: गोदावरी नदी आणि तिच्या उपनद्यांच्या किनारी केवळ वृक्षलागवडच नाही, तर त्यांचे 'संगोपन' करण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.
प्रभाग २ मधील सर्व भागांचा समान विकास आडगाव, जत्रा हॉटेल परिसर, जनार्दन स्वामी आश्रम, नांदूरनाका, कोणार्क नगर, बीडी कामगार नगर, अमृतधाम आणि ऐतिहासिक तपोवन या सर्व भागांतील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी ऐश्वर्या जेजूरकर यांनी विशेष कृती आराखडा तयार केला आहे. उच्चशिक्षित उमेदवार असल्याने, प्रशासकीय कामाचा पाठपुरावा करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा त्यांचा मानस आहे.
मतदारांचा वाढता प्रतिसाद ऐश्वर्या जेजूरकर यांच्या जनसंपर्क मोहिमेला प्रभागातील महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. "उच्चशिक्षित लोकप्रतिनिधीच प्रभागाचा चेहरा बदलू शकतो," अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. तपोवन आणि नांदूरनाका परिसरातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व जपून तिथे पर्यटन आणि सोयीसुविधा वाढवण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
प्रभाग २च्या शाश्वत विकासासाठी मी कटिबद्ध आहे. शहरातील नामांकीत आर्किटेक्ट, पर्यावरणप्रेमी, नगररचनाकार, वनस्पतीतज्ज्ञआदींच्या सहाय्याने शाश्वत विकासाचा कृती आराखडा अंतिम केला जाईल. नाशिकची हरित ओळख कायम ठेवली जाईल.
- ऐश्वर्या लाड-जेजूरकर, उमेदवार, प्रभाग २(अ)