रिल्स/व्हिडिओ बनवा.... भरघोस पारितोषिके जिंका...

Share:
Main Image
Last updated: 07-Jan-2026

अहिल्यानगर, (प्रतिनिधी) ७ जानेवारी - राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व महानगरपालिकेचे मुख्य निवडणूक अधिकारी यशवंत डांगे यांच्या संकल्पनेतून अहिल्यानगर मनपा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी १०० टक्के मतदानाची भूमिका बजावावी, तसेच मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी व मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी "आता माझी बारी-आली १५ जानेवारी" या विषयावर रिल्स/व्हिडिओ बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन मनपा स्वीप समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

​"माझे माझ्या शहरावर प्रेम असून मी लोकशाहीचा पाईक आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान करून मी लोकशाहीतील या महत्त्वपूर्ण दिवसाचा सन्मान करेन," या भावनेने या स्पर्धेचे नाव "आता माझी बारी- आली १५ जानेवारी" असे ठेवण्यात आले आहे. विजेत्या स्पर्धकांना भरघोस पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत.
​स्पर्धेसाठी १) उत्सव निवडणुकीचा-अभिमान माझ्या शहराचा, २) माझं मत-माझा अधिकार आणि ३) "आपले अहिल्यानगर मनपाचे मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी आहे - जरूर मतदान करा," हे तीन विषय असून ३० सेकंद ते १ मिनिटाचा रील/व्हिडिओ बनवणे आवश्यक आहे. रिल्समध्ये कोणत्याही राजकीय व्यक्तीचे नाव, उमेदवाराचे नाव, राजकीय पक्षाचे नाव किंवा निवडणूक चिन्ह असू नये. रिल बनवताना आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे.

​सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी रिल्ससोबत स्वतःचे संपूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता अहिल्यानगर मनपा स्वीप समितीच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर (८०५५८०९३९४) १५ जानेवारी २०२६ पर्यंत पाठवावा.

​रीलप्रेमी व सजग मतदारांनी मतदार जनजागृतीविषयक रिल्स/व्हिडिओ स्पर्धेसाठी पाठवून स्वतःच्या सोशल मीडियावर देखील शेअर करावेत, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार मुंढे, सहाय्यक आयुक्त मेहेर लहारे, स्वीप नोडल अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अशोक साबळे, मतदारदूत डॉ. अमोल बागुल, प्रसिद्धी अधिकारी नितीन ब्राह्मणे, प्रशासनाधिकारी जुबेर पठाण व सर्व स्वीप समिती सदस्य यांनी केले आहे.

Comments

No comments yet.