मुंबई, (प्रतिनिधी) ७ जानेवारी - आम आदमी पार्टीने आज महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांच्याकडे एकनाथ शिंदे यांच्या निवडणूक जाहिरातीविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली. ही जाहिरात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे पक्षाने म्हटले आहे.
“एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने महाराष्ट्रत १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मते मिळवण्यासाठी दूरदर्शन वाहिन्यांवर एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. हा व्हिडिओ निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या आदर्श आचारसंहितेचे उघड उल्लंघन करतो.
या जाहिरातीत असा खोटा दावा करण्यात आला आहे की, ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत सरकारकडून दिला जाणारा करदात्यांचा पैसा ही सरकारी योजना नसून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वैयक्तिक 'भेट' आहे. सरकारी योजना या स्वतः दिलेल्या भेटी आहेत असा दावा करणे कोणत्याही राजकारण्यासासाठी दिशाभूल करणारे आणि पूर्णपणे चुकीचे आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणीवपूर्वक मतदारांची दिशाभूल करत आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘लाडकी बहीण’ योजनेचा वापर करून मतदारांना लाच देण्याचा हा स्पष्ट प्रयत्न आहे. तसेच, जर मतदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मतदान केले नाही, तर त्यांना या योजनेपासून वंचित ठेवले जाईल, असे सुचवून ही जाहिरात मतदारांना अप्रत्यक्षपणे धमकावत आहे.
ही जाहिरात खोटी असून मतदारांना लाच देण्याचा आणि घाबरवण्याचा प्रयत्न करत असल्याने ती त्वरित काढून टाकण्यात यावी. तसेच स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांच्या हितासाठी शिवसेना पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्यावर वैयक्तिकरित्या त्वरित कारवाई करण्यात यावी,” असे मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी म्हटले आहे.