नाशिक, (प्रतिनिधी) ६ जानेवारी - एनसीसीएफ व नाफेडमार्फत कांदा विक्री केलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रलंबित २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना संक्रांतीच्या आत तातडीने अदा करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्र दिले आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रातील प्रमुख कांदा उत्पादक जिल्हा असून, येथील हजारो शेतकरी कुटुंबांचे अर्थकारण प्रामुख्याने कांदा पिकावर अवलंबून आहे. जून ते जुलै २०२५-२६ या कालावधीत एनसीसीएफ (NCCF) व नाफेड (NAFED) या केंद्र शासनाच्या संस्थांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण विभागाच्या किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून सुमारे तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला होता.
सदर कांदा खरेदी प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या मालाच्या मोबदल्यापोटी आत्तापर्यंत केवळ ७५ टक्के रक्कम अदा करण्यात आली असून, उर्वरित २५ टक्के रक्कम गेल्या पाच महिन्यांपासून प्रलंबित आहे. या रकमेबाबत वेळोवेळी पाठपुरावा करूनही आजतागायत शेतकऱ्यांना त्यांचा संपूर्ण मोबदला मिळालेला नाही. सध्या नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सुमारे १०० कोटी रुपये इतकी रक्कम येणे बाकी आहे. ही रक्कम वेळेत न मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून, शेतीवरील खर्च, कर्जफेड यासह मोठ्या अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत असल्याचे म्हटले आहे.
या थकीत रकमेच्या विरोधात दि.५ जानेवारी २०२५ रोजी नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलने व निदर्शने केली आहे. शासनाकडून तातडीने निर्णय न झाल्यास परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मकर संक्रांती हा शेतकरी वर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा सण असून,या सणाच्या अगोदरच शेतकऱ्यांना त्यांच्या कांद्याची उर्वरित २५ टक्के रक्कम मिळाल्यास त्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना,आर्थिक परिस्थिती व सामाजिक शांतता लक्षात घेता या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे एनसीसीएफ व नाफेडमार्फत कांदा विक्री केलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रलंबित २५ टक्के रक्कम तातडीने अदा करण्याबाबत संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश द्यावेत अशी मागणी छगन भुजबळ यांनी पत्राद्वारे केली आहे.