मुंबई, (प्रतिनिधी) ६ जानेवारी - एसटी, अर्थात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात ८ हजार नवीन बसेस या वर्षअखेरपर्यंत दाखल करा, त्यासाठी सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया तातडीनं गतिमान करा, अशा सूचना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिल्या आहेत. ते एसटी महामंडळाच्या सन २०२५–२६ च्या अर्थसंकल्पीय निधीच्या वापराबाबत बोलावलेल्या आढावा बैठकीत बोलत होते. यामध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही, संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
यंदाच्या अर्थसंकल्पात एसटीसाठी शासनानं २ हजार ४६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र आर्थिक वर्ष संपायला अवघे तीन महिने शिल्लक असताना त्यापैकी सुमारे १ हजार ६०० कोटी रुपये खर्चाविना परत जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. उरलेल्या तीन महिन्यांत जास्तीत जास्त निधी खर्च करून नवीन बसेस, बसस्थानकं, प्रसाधनगृहं आदींच्या निर्मितीसाठी आवश्यक निविदा आणि प्रशासकीय प्रक्रिया तातडीनं पूर्ण कराव्यात, आणि प्रकल्पांना गती द्यावी, असे निर्देश सरनाईक यांनी दिले.