नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ६ जानेवारी - अमेरिका व्हेनेझुएलाच्या दैनंदिन कारभारात लक्ष देणार नसून राजकीय बदल घडवून आणण्यासाठी तेल निर्यातबंदी लागू करेल, असं अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी सांगितलं आहे. दोन दिवसांपूर्वी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकेने ताब्यात घेतल्यानंतर व्हेनेझुएलाचं सरकार अमेरिका चालवेल, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर रुबियो यांनी हे विधान केलं आहे. व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी देशाच्या हंगामी अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतली आहेत. त्यानंतर डेल्सी यांनी अमेरिकेला व्हेनेझुएलातल्या कच्च्या तेलाचे स्रोत वापरण्याची, त्याचं नियमन करण्याची मुभा द्यावी, अन्यथा वाईट परिणामांना सामोरं जावं लागेल अशी ताकीद डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.
चीनने अमेरिकेचा तीव्र निषेध केला आहे. जगाचे न्यायाधीश म्हणून अमेरिकेने वागू नये असा इशारा चीनने दिला आहे. अमेरिकेची गुंडगिरी वाढत असून सर्व देशांचं सार्वभौमत्व आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार जपलं गेलं पाहिजे असं चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अमेरिकेने व्हेनेझुएलात केलेल्या लष्करी कारवाईत क्युबाचे ३२ लष्करी आणि पोलीस अधिकारी मारले गेल्याचं क्युबानं म्हटलं आहे. मृत अधिकाऱ्यांना आदरांजली वाहण्यासाठी क्युबाने दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.
गरज नसल्यास प्रवास टाळा, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे आवाहन
वेनेझुएलातील अलीकडील राजकीय आणि सामाजिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना (ट्रॅव्हल ॲडव्हायझरी) जारी केली आहे. वेनेझुएलातील सद्यस्थिती पाहता, भारतीय नागरिकांनी अत्यंत आवश्यक कामाशिवाय त्या देशाचा प्रवास करणे टाळावे, असे आवाहन केंद्र सरकारकडून अधिकृतपणे करण्यात आले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार, जे भारतीय नागरिक सध्या वेनेझुएलामध्ये वास्तव्यास आहेत, त्यांनी कमालीची सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. तेथील भारतीयांनी आपल्या हालचालींवर मर्यादा ठेवाव्यात आणि शक्यतो सुरक्षित ठिकाणी राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी नागरिकांनी काराकस येथील भारतीय दूतावासाच्या सातत्याने संपर्कात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांच्या मदतीसाठी भारतीय दूतावासाने संपर्क यंत्रणा सज्ज ठेवली असून, नागरिक cons.caracas@mea.gov.in या ईमेलवर किंवा +58-412-9584288 या तातडीच्या फोन नंबरवर संपर्क साधू शकतात. परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून भारतीय प्रवाशांनी या सूचनांचे पालन करावे, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.