६ जानेवारी रोजी पत्रकार दिन का साजरा केला जातो?

Share:
Main Image
Last updated: 06-Jan-2026
- डॉ. स्वप्नील तोरणे, जनसंवाद तज्ज्ञ
  भ्रमणध्वनी: 98817 34838
 drswapniltorne@gmail.com
 
6 जानेवारी - मराठी पत्रकारितेचा अभिमानाचा दिवस. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनी साजरा होणारा मराठी पत्रकार दिन हा केवळ औपचारिक सोहळा नाही, तर मराठी पत्रकारितेच्या दृष्टीने ऐतिहासिक दिवस आहे. 1832 साली सुरू झालेल्या ‘दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्राने समाजाला विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची आणि सत्याशी सामना करण्याची दृष्टी दिली. त्या काळात पत्रकारिता ही केवळ बातम्यांचे संकलन नव्हते, तर सामाजिक जागृतीचे प्रभावी साधन होते. शिक्षण, सुधारणावाद, स्वातंत्र्याची चळवळकृया साऱ्यांमध्ये मराठी पत्रकारितेचा वाटा मोलाचा राहिला आहे.
भारतात मुद्रणकलेचा प्रवेश सोळाव्या शतकात झाला. तेव्हाच भारतातील वृत्तपत्रसृष्टीचे अप्रत्यक्षपणे बीजारोपण झाले होते. मात्र भारतातले पहिले वृत्तपत्र सुरु झाले 29 जानेवारी 1780 रोजी बेंगॉल गॅझेट हे जेम्स ऑगस्टस् हीकी याने सुरू केले. मराठीत मात्रवृत्तपत्र काहीसे उशिराच सुरु झाले. गुजराती वृत्तपत्र मुंबईत प्रथम सुरु झाले. याचे कारण मुद्रण क्षेत्रात पारशी समाजाचा अधिक प्रभाव होता आणि शिक्षणातही हा समाज आघाडीवर होता आणि त्यांनी गुजराती ही आपली भाषा म्हणून स्वीकारली होती. मुंबईत इंग्रजी वृत्तपत्र निघाल्यावर सुमारे चाळीस वर्षांनंतर व गुजराती वृत्तपत्रे निघाल्यानंतर दहा-बारा वर्षांनंतर मराठीत वृत्तपत्र निघाले. कारण मराठीतून वृत्तपत्र निघावे असा उत्साह कुणीच दाखवला नव्हता. पहिल्यांदा असे धाडस करावे असा विचार बाळशास्त्री जांभेकरांच्याच मनात निर्माण झाला. त्यांच्या सामाजिक चळवळी व इतर कार्यक्रमांमध्ये वृत्तपत्र हे महत्वपूर्ण साधन होऊ शकेल असा त्यांना विश्वास वाटला. बाळशास्त्री हे अनेक विषयांचे व भाषांचे जाणकार होते. त्यांना बंगाली वृत्तपत्रामुळे तेथल्या समाज जीवनावर झालेल्या सकारात्मक प्रभावाची माहिती मिळत होती. राजाराम मोहन रॉय यांच्या समाज सुधारणांच्या कार्यातील संवाद कौमुदी सारख्या वृत्तपत्रचे माध्यमाचे महत्व बंगाली भाषा जाणत असलेल्या बाळशास्त्रींना चांगल्या प्रकारे ज्ञात होते. मुंबईत आधीच सुरु झालेली गुजराती व वृत्तपत्र होती त्यामुळे मराठी भाषी लोक वृत्तपत्रकडे वळणे अपरिहार्य होते. ज्ञानाचा प्रसार करण्यास प्रथम त्यांचा संग्रह व्हावा लागतो. ज्ञान दुसÚयास देण्यास आत्मविश्वास वाढीस लागावा लागतो. त्याची संपन्नता अनुभवण्यास येण्यास काही कालावधी लागतो. संपन्नतेनंतर ज्ञानदानाची प्रेरणा लाभते. मराठी वृत्तपत्रे अशाच प्रेरणेनंतर निर्माण झाले.
बरेच दिवस मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र म्हणून दिग्दर्शन व प्रभाकर या वर्तमानपत्रांचा उल्लेख केला जात असे. मात्र इतिहास संशोधकांनी बऱ्याच संशोधन व अध्ययनानंतर मराठी भाषेतील आद्य वर्तमानपत्र असल्याचा मान दर्पण या नियतकालिकास दिला.
दर्पणचा पहिला अंक दि. 06 जानेवारी 1832 साली निघाला. संपादक बाळशास्त्री जांभेकरांनी या अंकाची तयारी मात्र दोन महिने अगोदरच केली असल्याचे पुरावे आढळतात. 1931 च्या दिपावलीपासून दर्पणचा शुभारंभ करावयाचा बाळशास्त्रींच्या मनात होते. मात्र विविध अडचणींना तोंड देता देता उशीर होत गेला. दर्पण हे सुरुवातीस पाक्षिक स्वरुपात प्रसिध्द होत असे. पहिल्याच अंकात चालकांनी या नियतकालिकाच्या प्रसिध्दी मागचा हेतू विदित करणारे आत्मनिवेदन छापले आहे. प्रस्ताव या मथळयाखाली 12 माहे नोव्हेंबर सन 1831 मु.मुंबई अशी तारीख पहिल्या अंकात आहे. पाक्षिक असल्यामुळे महिन्यातून दोन वेळा हे नियतकालिक प्रसिध्द केले जात असे. हे नियतकालिक ऍँग्लो-मराठी स्वरुपातले असे म्हणजे निम्मा पान मजकूर इंग्रजी तर निम्मे पाव मजकूर मराठीत असे. अशी डेमी 8 पाने प्रत्येकी दोन कॉलमी मजकुराची असत. ’दर पंधरा दिवसात छापावयाचे पुस्तक 1, कागद 1, किंमत दर तीन महिन्यास रुपये सहा’ असे अंकावर छापले जात. यात संपादक म्हणून पहिल्या अंकावर बाळशास्त्री जांभेकरांच्या नावाचा उल्लेख नसला तरी पत्राच्या दुसऱ्या अंकापासूनच जिज्ञासू वाचकांच्या शंका आणि निरसण अशा सदराखाली तो आढळतो.
’दर्पण’चे संपादक बाळशास्त्री जांभेकर हयांचे स्वतंत्र कर्तृत्वही थोर आहे. आज काळाच्या पडद्याआड जाऊन अज्ञात ठरलेली दर्पणाच्या आधीची व नंतरच्या सुमारे 25-30 वर्षांच्या काळातील वृत्तपत्रे लक्षात घेतली तरी ’दर्पणा’ला उच्च स्थान द्यावेच लागते असेच त्याचे कार्य आहे. ’लोकहितवादी’ सरदार गोपाळराव हरी देशमुख यांनी लोकांची ’बृहत्तर जिव्हा’ असा वृत्तपत्रांचा जो गौरव केला होता त्याला पात्र ठरावे असे ’दर्पण’ पत्र होते. बाळशास्त्री जांभेकर इंग्रजी भाषेचे विद्वान होते. ते इंग्रजी अमल सुरु झाल्यावर पहिल्या दहावीस वर्षात प्रसिध्दी पावलेल्या लोकांत अग्रगण्य होते. कोकणातील देवगड तालुक्यातील पोंभुर्ले येथे 1812 साली बाळशास्त्री यांचा जन्म झाला. त्यांना अवघी 35 वर्षे आयुष्याची लाभली. 1825 च्या सुमारास ते मुंबईत आले व बापू छत्रे यांच्या आश्रयाने त्यांनी विद्याभ्यासाला सुरुवात केली. 1830 मध्ये हैंद शाळा पुस्तक मंडळीचे नेटिव्ह सेक्रेटरी म्हणून बाळशास्त्र्यांची नेमणूक झाली. 1831 पासून त्यांनी ग्रंथरचनेला प्रारंभ केला व 1832 च्या सुरुवातीला ’दर्पण’ वृत्तपत्र त्यांनी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी काढले. 1834 साली एल्पिफन्स्टन निधीच्या प्राध्यापक-पदावर त्यांची योजना झाली. 1845 साली बाळशास्त्री अध्यापनवर्गाचे संचालक झाले. 17 मे 1846 रोजी त्यांचे देहावसान झााले. बाळशास्त्र्यांचे आयुर्मान अल्पच होते. पण ते सर्व ज्ञानोपासनेत व ज्ञानदानात गेले. विद्यार्थीवर्ग व लोकसमाज हयांचे उद्बोधन करण्यात त्यांची सारी हयात गेली. या अंगीकृत कार्याचा एक भाग म्हणून त्यांनी अध्यापन केले, ग्रंथ लिहिले आणि वृत्तपत्र चालविले. नव्या विद्येच्या प्रकाशात ज्या उणिवा समाजात दिसल्या, त्या दूर करण्याचा त्यांनी कृतीने प्रयत्न केला. त्यांना इंग्रजी, मराठी, संस्कृत, बंगाली, कन्नड आदी नऊ भाषा अवगत होत्या. भाषाज्ञान, इतिहास, गणित, पदार्थविज्ञान, भूगर्भशास्त्र, पुरातत्व अशा विविध विषयांत बाळशास्त्र्यांना रस होता व त्यांवर त्यांनी विपुल प्रमाणात लेखन केल्याचा उल्लेख आढळतो.
’दर्पण’ पत्राचा पहिला अंक ’शुक्रवार, 6 जानेवारी सन 1832’ रोजी बाहेर पडला. प्रथम काही महिने पत्र पाक्षिकच होते. पण अनेक विषय पंधरा दिवसांनी लिहावयाचे म्हणजे शिळे होऊन जातय म्हणून वाचकांनीच पत्र साप्ताहिक करण्याची मागणी केली. 4 मे 1832 च्या अंकापासून पत्राचे साप्ताहिकात रफपांतर करण्यात आले. ता. 27 एप्रिलच्या अंकात, ^FromFriday next we shall accordingly issue a weekly publication*     असे संपादकीयात म्हटले होते. 
 
’दर्पण’चा पहिला अंक प्रसिध्द होण्यापूर्वी 12 नोव्हेंबर 1831 रोजी पत्राचा उद्देश स्पष्ट करणारा ’प्रस्ताव’ (प्रॉस्पेक्ट्स) प्रसिध्द करण्यात आला होता. पहिल्या अंकात तो पुन्हा देण्यात आला होता. नव्या ज्ञानाचा, पाश्चात्य विद्यांचा लोकांना परिचय व्हावा, त्यांचा अभ्यास व्हावा व त्या द्वारा देशाची समृध्दी व लोकांचे कल्याण साधावे अशा हेतूने या वृत्तपत्राची सुरुवात करण्यात आली होती.
’स्वदेशीय लोकांमध्ये विलायतेतील विद्यांचा अभ्यास अधिक व्हावा आणि या देशाची समृध्दी व येथील लोकांची कल्याण या विषयी स्वतंत्रतेने व उघड रीतीने विचार करावयास स्थळ व्हावे, या इच्छेने कित्येक मुंबईत राहाणारे लोकांचे मनात आहे की दर्पण या नावाचे एक न्यूजपेपर म्हणजे वर्तमानपत्र छापून प्रसिध्द करावे... या देशाचे लोकांत विलायती विद्यांचा अभ्यास वाढावा, तेथील ज्ञान प्रसिध्द व्हावे अशे नात्याने या वर्तमानपत्राचा उद्योग मुख्यत्वे आरंभिला आहे खरा ; परंतु ज्यास इंग्रजी भाषा येते त्यांस मात्र याचा उपयोग असे न व्हावे म्हणोन योजिले आहे की, एक बाजूस इंग्रजी व एक बाजूस मराठी असावे म्हणजे जे मराठी मात्र जाणतात त्या सर्वांसही याचा उपयोग होईल... मूळ विषय आणि भाषांतर समोरासमोर छापली जातील. तसेच विलायतेतील विद्या, कला, कौशल्ये यांविषयीचे व त्यातील ज्या भागांचा उपयोग या देशात झाल्यास फार हित आहे, याविषयींचे लहान लहान ग्रंथ लिहिले जातील. अशे गोष्टींपासून जिज्ञासू पुरुषांस शोध करायास आणि विद्येत परिश्रम करणारांस विचार करावयास विषय मिळतील परंतु जे शुध्द मनोरंजन मात्र इच्छितात, त्यांचीही हृदये दर्पणामध्ये लहान लहान चमत्कारिक ज्या गोष्टी असतील त्यांपासून संतुष्ट होतील. मनोरंजन करणे, चालते काळाची वर्तमाने कळविणे आणि योग्यतेस येण्याचे मार्ग दाखविणे, या गोष्टींची दर्पण छापणारांस मोठी उत्कंठा आहे. कोणा एकाचा पक्षपात किंवा नीचपणा या दोघांचा मळ दर्पणास लागणार नाही. कारण की दर्पण छापणारांचे लक्ष्य निष्कृत्रिम आहे म्हणून हे वर्तमानपत्र ज्या रीतीने भले आणि गुणी पुरुषांस मान्य होईल त्या रीतीने करण्यास ते दृढ निश्चयाने उपयोग करतील!’’ असे स्पष्ट शब्दात बाळशास्त्री यांनी मांडले आहे.
बातमी व तीवरील संपादकीय लेखन हे त्वरीत, विनाविलंब प्रसिध्द करणे महत्वाचे असते, हयाची बाळशास्त्रांना चांगली जाणीव असल्याचे दिसते. शिवाय, ’दर्पण’ वाचण्याची वाचकांत गोडी निर्माण झाली होती, असेही दिसते. कारण ’दर्पण’चे साप्ताहिकात रुपांतर करण्याची निकड जशी संपादकांना वाटली, त्याप्रमाणे वाचकांचीही तशी मागणी होती. दर्पणाची त्रैमासिक वर्गणी रुपये सहा होती.
वाचकांच्या पत्रांना मराठी वृत्तपत्रात सतत महत्वाचे स्थान मिळत आले आहे. ’दर्पण’ या पहिल्या वृत्तपत्रातही वाचकांची पत्रे प्रथमपासून आढळतात. क्वचित संपादकीय उत्तरांसह पत्रे प्रसिध्द होत असत. वाचकाला मनमोकळेपणाने बोलता करणारे वाचकांची पत्रे सदर आहे. ’दर्पण’मध्येही अतिशय स्पष्टपणे वाचकांनी लिहिलेली पत्रे आढळतात. मराठी निबंधाचे मूळही अशा पत्रांतून सापडत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. ज्ञान प्रबोधनासाठी अस्तित्वात आलेल्या ’दर्पण’ पत्रात वाचकांना सामान्यतः मोकळेपणाने आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी देण्यात येत असली, तरी संपादक बाळशास्त्री त्यांचा संयम सुटू न देण्याची दक्षता घेत असत. स्तुतिपर पत्रे छापली जात नसत व तसा स्पष्ट खुलासाही ’दर्पणा’तून करण्यात येत असे.
’दर्पण’ हे मतपत्र असल्याने त्यात वृत्तापेक्षा लोकांना काही तरी सांगण्याला, समजावून देण्याला अधिक महत्व व प्राधान्य दिले जाणे स्वाभाविक होते. त्याकाळी बातम्या मिळण्याची साधनेही फारशी नव्हती. यामुळे बातम्यांना फारसे स्थान नसले तर नवल नाही. पण ’दर्पण’ कोणाचे मिंधे नव्हते. जनतेला ज्ञान देऊन ते प्रबोधन करीत होतेे. पण सरकारलाही माहिती देऊन लोकमत दाखविण्याचा प्रयत्न असे. यामुळे देश्हिताचे वृत्तपत्रे या साधनाचा प्रसार होत गेला. बाळशास्त्र्यांची टीका निर्भीड पण विधायक असे. सरकारलाही योग्य त्या सुधारणा शिकविण्यास ते मागेपुढे पाहात नसत. सरकारचे जणू ते सल्लागार होते. बाळशास्त्र्यांच्या या वृत्तपत्रीय धोरणामागे स्वाभिमान होता.
बाळशास्त्र्यांच्या विद्वतेविषयी ’बॉम्बे टाईम्स’, ’कुरियर’, ’ज्ञानोदय’, ’ओरिएन्अल ख्रिश्चन स्पेक्टेटर’, बोर्ड ऑपफ एज्युकेशन, मुंबईच्या सुप्रिम कोर्टाचे न्यायाधिश सर टी.ई.पेरी, रेव्ह.डॉ.विल्सन, न्या.मू.चंदावरकर यांनी व इतर अनेक नियतकालिकांनी व थोर व्यक्तींनी अत्यंत गौरवाचे उद्गार काढलेले आहेत. बाळशास्त्र्यांच्या हाताखाली विद्यार्थी म्हणून वावरलेल्या दादाभाई नौरोजी यांनी आपल्या गुरुविषयी विशेष आदराने लिहिलेले आढळते. ’पश्चिम भरतखंडातील अर्वाचीन विद्वन्मुकुटमणी’, ’प्रख्यात पंडित’, ’अद्वितीय विद्वान’ अशा शब्दांत बाळशास्त्र्यांच्या विद्वत्तेबद्दल दादाभाईंनी लिहिले आहे. ’मुंबईना समाचार’, ’मुंबईना चाबुक’ या गुजराती वृत्तपत्रांनीही शिक्षागुरु बाळ गंगाधरशास्त्री यांची स्मृती चिरस्थायी करण्याची जरुरी असल्याचे त्यांच्यावरील मृत्युलेखात म्हटले होते. 
आजच्या डिजिटल युगात माहितीचा वेग प्रचंड वाढला आहे. सोशल मीडिया, ब्रेकिंग न्यूज, व्हायरल कंटेंट यांच्या गर्दीत सत्य, संतुलन आणि विश्वासार्हता ही पत्रकारितेची मूलभूत मूल्ये अधिकच महत्त्वाची ठरतात. पत्रकार हा केवळ बातमी देणारा नसून समाजाचा आरसा असतोकृतो आरसा स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी मोठी आहे. मराठी पत्रकारितीने कायमच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम केले. प्रश्न विचारले पाहिजेत, अन्यायाला वाचा फोडली आणि सामान्य माणसाच्या आवाजाला व्यासपीठ दिले. त्याच वेळी संवेदनशीलता, सामाजिक भान आणि नैतिकता जपली. 
मराठी वृत्तपत्रांचा असा सक्षम पाया रचणाऱ्या आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना आणि त्यांच्या दर्पणला म्हणूनच मनःपूर्वक अभिवादन.

Comments

No comments yet.