नाशिकच्या लेकींची दमदार कामगिरी... सलग पाचव्या विजयासह नाशिक गट विजेते...

Share:
Main Image
Last updated: 05-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ५ जानेवारी - सोलापूर येथे झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित, राज्यस्तरीय, १९ वर्षांखालील महिलांच्या आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट (इन्व्हिटेशन लीग) स्पर्धेत , नाशिकने हिंगोली, सोलापूर ,बीड, झोरास्त्रियन - पुणे पाठोपाठ नंदुरबारवर देखील मोठा विजय मिळवून सहा संघाच्या या बी गटात अजिंक्य राहून गट विजेतेपद मिळवले. उत्तम सांघिक प्रयत्नाने नाशिकने पाचही साखळी सामन्यात आपली विजयी घोडदौड कायम राखत पुढील फेरीत रुबाबात प्रवेश केला. मधुरा दायमाने ४  बळी, तर आराध्या बोटवेने ६५ धावा करून नंदुरबार वरील  विजयात  मोठा वाटा उचलला. 

प्रथम फलंदाजी मिळालेल्या नाशिकने या पाचव्या एकदिवसीय सामन्यात सलामीच्या आराध्या बोटवेच्या ६५, यष्टीरक्षक काव्या दिघे ४४ व कर्णधार कार्तिकी गायकवाडच्या २६ धावांच्या जोरावर ४१.५  षटकांत सर्वबाद २०६  धावा केल्या. त्यानंतर नाशिकने नंदुरबारला ३३.३ षटकांत सर्वबाद ५९ धावांतच रोखले. मधुरा दायमाच्या भेदक ऑफ स्पिनने ४ बळी घेतले, तिला आर्या गाडगीळ व संस्कृति कंटकने प्रत्येकी २ तर निर्जला वाघने  १ बळी घेत साथ दिली व नाशिक संघाने १४७  धावांनी मोठा विजय मिळवत लागोपाठ पाचव्या  विजयाची नोंद केली. या संघाला प्रशिक्षक भावना गवळी व डॉ. भाविक मंकोडी यांचे मार्गदर्शन लाभले.

१९ वर्षांखालील नाशिकच्या महिला संघाच्या या उत्कृष्ट कामगिरी बद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा व  सेक्रेटरी  समीर रकटे यांनी संपूर्ण संघाचे व प्रशिक्षकांचे खास अभिनंदन केले.

Comments

No comments yet.