नाशिक, (प्रतिनिधी) ५ जानेवारी - लग्नाचे आमिष दाखवून एकाने तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. लग्नास नकार दिल्याने युवतीने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश रामदास शेवाळे (३४ रा.रामलिला लॉन्सच्या बाजूला जत्रा हॉटेल आडगाव शिवार) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार तिचे सन. २०२३ पासून संशयिताशी प्रेमप्रकरण आहे. संशयिताने विश्वास संपादन करीत तिला लग्नाचे आमिष दाखविले होते. या काळात स्व:ताच्या आणि तरुणीच्या घरात तसेच सामनगाव रोड भागात घेवून जात वेळोवेळी बलात्कार केला. दोन अडीच वर्ष हा प्रकार सुरू होता. युवतीच्या कुटुंबीयांनी लग्नाची तयारी सुरू केल्याने तिने संशयिताकडे तगादा लावला असता हा प्रकार घडला. संशयिताने लग्नास नकार दिल्याने तिने पोलीसात धाव घेतली असून तपास सहाय्यक निरीक्षक कोरडे करीत आहेत.
पिस्तूल बाळगणाऱ्या तडिपारास अटक
नाशिक : पिस्तूल बाळगणाऱ्या तडिपारास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. साईनाथनगर भागात ही कारवाई करण्यात आली. संशयिताच्या ताब्यातून काडतुसांनी भरलेला गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृष्णा चंदू चव्हाण (२३ रा.अश्विनी कॉलनी,सामनगावरोड नाशिकरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. चव्हाण याच्या वाढत्या गुन्हेगारीस रोखण्यासाठी पोलीसांनी त्याच्याविरूध्द हद्दपारीची कारवाई केली आहे. शहर आणि जिह्यातून त्यास दोन वर्षांसाठी तडिपार केलेले असतांनाही त्याचा वावर शहरातच होता. पोलीस त्याच्या मागावर असतांना रविवारी (दि.४) रात्री तो साईनाथनगर येथील मरी माता मंदिराजवळ सापडला. संशयिताच्या अंगझडतीत काडतुसांनी भरलेला पिस्तूल असा सुमारे ३० हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज मिळून आला आहे. याबाबत अंमलदार समाधान वाजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून तपास हवालदार कुऱ्हाडे करत आहेत.