हिंदी बोलण्याच्या वादातून कारची तोडफोड

Share:
Last updated: 05-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ५ जानेवारी - हिंदी बोलण्याच्या वादातून दोघांनी दहशत निर्माण करीत परप्रांतीय तरूणांची कार फोडल्याचा प्रकार महामार्गावरील राजीवनगर भागात घडली. या घटनेत दगडाने कारच्या काचा फोडण्यात आल्याने मोठे नुकसान झाले असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव व रोशन अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित दुकलीचे नाव आहे. याबाबत हर्ष संतोष राठोड (२७ रा.विजयनगर इंदोर मध्यप्रदेश) या युवकाने फिर्याद दिली आहे. 

राठोड व त्याचे दोन मित्र शनिवारी (दि.३) रात्री शहरात दाखल झाले होते. महामार्गाला लागून असलेल्या राजीवनगर येथील हॉलीडे इन या हॉटेलच्या पार्किंगमध्ये कार लावून ते गप्पा मारत असताना हा प्रकार घडला. तिघे मित्र हिंदी भाषेत बोलत असतांना दोघा संशयितांनी त्यांना गाठले. तुम्ही हिंदी काय बोलता आमच्याशी मराठीत बोला, या कारणातून त्यांनी वाद घातला. यावेळी संतप्त दुकलीने परिसरात दहशत माजविली. यावेळी आरडाओरड आणि शिवीगाळ करीत  तिघा मित्रांना दमदाटी केली. या घटनेत संशयितापैकी एकाने जवळ पडलेला दगड उचलून राठोड यांची कार फोडली असून, पुढील व ड्रायव्हर साईडच्या खिडकीच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले आहे. याप्रकरणाचा तपास हवालदार गारले करीत आहेत.

खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासात चोरी

नाशिक - बस प्रवासात भामट्यांनी एका प्रवाशाच्या बॅगेतील साडे तीन लाखाच्या रोकडवर डल्ला मारला. हा प्रकार इंदोर नाशिक प्रवासादरम्यान खासगी ट्रव्हल्सच्या बसमध्ये घडला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमित हॅन्ली विसर्ड (रा.श्रीजी व्हॅली, इंदोर) यांनी फिर्याद दिली आहे. विसर्ड गेल्या २२ डिसेंबर रोजी शहरात आले होते. २१ डिसेंबरच्या रात्री त्यांनी हंस ट्रव्हल्सच्या बसमधून प्रवास केला असता ही घटना घडली. बस प्रवासात अज्ञात चोरट्यांनी बॅगेतील साडे तीन लाख रूपयांची रोकड चोरून नेली असून तपास हवालदार साळुंके करीत आहेत.

Comments

No comments yet.