नाशिक, (प्रतिनिधी) ५ जानेवारी - नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्र.२ अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून भारतीय जनता पार्टीने उच्चशिक्षित,अभ्यासू आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या ऐश्वर्या जयवंत जेजुरकर यांना उमेदवारी देत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा निर्माण केली आहे. भाजपचा हा निर्णय म्हणजे केवळ उमेदवारी नसून,विकास,शिक्षण, तंत्रज्ञान आणि सामाजिक न्याय यांचा स्पष्ट संदेश देणारा राजकीय मास्टरस्ट्रोक मानला जात आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मधुकर शंकरराव जेजुरकर यांच्या सून असलेल्या ऐश्वर्या जेजुरकर या नाशिक शहरातील प्रतिष्ठित आणि समाजसेवेत अग्रेसर असलेल्या जेजुरकर कुटुंबाच्या सामाजिक परंपरेचा वारसा पुढे नेत आहेत. अनेक दशके सामाजिक, धार्मिक व सेवाभावी कार्यात कार्यरत असलेल्या या कुटुंबाचे नाव प्रभाग क्रमांक २ मध्ये विश्वासाचे आणि नेतृत्वाचे प्रतीक मानले जाते.
बी.ई.कॉम्प्युटर शिक्षण घेतलेल्या ऐश्वर्या जेजुरकर या केवळ नावापुरत्या उमेदवार नसून, आधुनिक तंत्रज्ञानाची सखोल जाण असलेले नेतृत्व आहेत. डिजिटल युगात महापालिकेचे प्रशासन अधिक पारदर्शक,जलद आणि लोकाभिमुख कसे करता येईल, याचा ठोस आराखडा त्यांनी तयार केला आहे. फक्त घोषणा नव्हे, तर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्यक्ष काम ” हे त्यांचे ठाम ब्रीदवाक्य आहे.
त्यांनी महिला, युवक आणि दुर्बल घटकांसाठी ठोस अजेंडा तयार केला आहे. यामध्ये प्रभागातील स्वच्छतेची कायमस्वरूपी समस्या, पाणीपुरवठ्याची अनियमितता, सरकारी शाळा व शिक्षणाची गुणवत्ता, प्राथमिक आरोग्य सेवा व महिला आरोग्य, डिजिटल सुविधा, ऑनलाइन तक्रार निवारण या मुद्द्यांचा ठोस समावेश आहे. लोकप्रतिनिधी म्हणजे निवडणुकीपुरता चेहरा नसतो. प्रभागातील प्रत्येक प्रश्नासाठी, प्रत्येक नागरिकासाठी कायम उपलब्ध राहणारे नेतृत्व मी देईन. असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
भारतीय जनता पार्टीने ऐश्वर्या जेजुरकर यांना उमेदवारी देत महिला सक्षमीकरण, उच्चशिक्षण आणि सामाजिक न्याय या मुद्द्यांवर आपली ठाम भूमिका अधोरेखित केली आहे. भाजपने केवळ आरक्षण पूर्ण केले नाही, तर काम करणारी, निर्णयक्षम आणि भविष्यातील नेतृत्व देणारी महिला उमेदवार जनतेसमोर ठेवली आहे, असा राजकीय संदेश यातून दिला जात आहे.
प्रभाग क्रमांक २ मध्ये सध्या बदलाची तीव्र अपेक्षा असून, जुनी निष्क्रिय व्यवस्था, अपूर्ण विकासकामे आणि दुर्लक्षित प्रश्नांमुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. अशा परिस्थितीत सौ. ऐश्वर्या जयवंत जेजुरकर या नवा चेहरा, नवे विचार आणि ठोस कृतीचा विश्वास देणारे नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत. माझी लढाई पदासाठी नव्हे, तर प्रभागातील प्रत्येक कुटुंबाच्या सन्मान, सुविधा आणि भविष्यासाठी आहे, अशी ठाम भूमिका ऐश्वर्या जेजुरकर यांनी व्यक्त केली आहे.
प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजपकडून उभ्या राहिलेल्या या उच्चशिक्षित, सामाजिकदृष्ट्या सजग आणि आक्रमक महिला उमेदवारामुळे निवडणुकीचे गणित बदलणार हे चित्र आता स्पष्ट होत आहे.