महिलेला मारहाण करीत पळवून नेण्याचा प्रयत्न... म्हसरूळ भागातील प्रकार...

Share:
Last updated: 05-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ५ जानेवारी - घरासमोर शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने संतप्त सराईतांनी महिलेस मारहाण करीत बळजबरीने रिक्षात डांबून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. झटापटीत प्रसंगावधान राखत महिलेने रिक्षातून झोकून दिल्याने अनर्थ टळला आहे. मात्र रिक्षा उलटल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेची दखल घेत पोलीसांनी जखमी महिलेस सोडून पळ काढणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. संशयित पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अपहरण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार राहूल संजय तुरे (रा.फुलेनगर पंचवटी) व राहूल राजेंद्र निरभवणे (रा.नमन हॉटेल मागे, पेठरोड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत ४० वर्षीय विवाहीत पीडितेने फिर्याद दिली आहे. पीडिता गुरूवारी (दि.१) रात्री जेवण आटोपून परिसरात फेरफटका मारण्यास गेली होती. रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास ती आपल्या घरी फेरफटका मारून परतली असता ही घटना घडली. घराजवळ अ‍ॅटोरिक्षा पार्क करून संशयित आरडाओरड करीत कुणाला तरी शिवीगाळ करत होते. माझ्या घरासमोर कुणाला शिवीगाळ करता असा जाब विचारल्याने संशयितांनी महिलेचा विनयभंग करीत मारहाण केली. मध्यरात्र आणि परिसरात शुकशुकाट असल्याची संधी साधत संशयितांनी महिलेस बळजबरीने रिक्षात बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. 

घरापासून काही अंतरापर्यंत आरडाओरड व संशयिताशी प्रतिकार करूनही तिच्या मदतीला कोणी धावून आले नाही. अखेर महिलेने प्रसंगावधान राखत स्व:ताला रिक्षातून रस्त्यावर झोकून दिले. या घटनेत चालकाचे नियंत्रण सुटून रिक्षा महिलेच्या अंगावर उलटली. 

कशीबशी रिक्षा उचलून महिलेस जखमी अवस्थेत सोडून भामट्यांनी पोबारा केला होता. या घटनेत महिलेच्या हाता पायांसह पाठीस गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी दोघांना बेड्या ठोकल्या असून त्यांना न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तपास उपनिरीक्षक सचिन मुद्रुपकर करीत आहेत.

Comments

No comments yet.