– रणजित पवार, उपसंपादक, विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर
जगण्यासाठी मूलभूत गरज असलेल्या अन्नाची आवश्यता आहे, ती मातीतून पिकणाऱ्या अन्न धान्यामुळे पूर्ण होते. जमिनीमधील मातीचे परीक्षण करून योग्य पद्धतीने उत्पादन घेतले तर पिकांचे उत्पादन वाढेल. शेतातील माती निरोगी असेल तर समृद्ध शेती होईल. त्यासाठी मातीचे परीक्षण करुन समृद्धता वाढविण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी आहात, तुमच्याकडे जमीन आहे तर तुम्ही माती परीक्षण केले पाहिजे. चल, आपली माती आणि तिची गुणवत्ता जाणून घेऊ या!….
मातीचे महत्त्व
अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा मातीशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. माती विना शेती शक्य नाही त्यामुळे निरोगी माती ही समृद्ध शेतीसाठी अत्यंत आवश्क आहे. मानवाने विज्ञान व तंत्रज्ञानातून कितीही प्रगती साधली, तरी एकदा नष्ट झालेली माती पुन्हा निर्माण करता येत नाही, हे वास्तव आहे. 10 सेंटीमीटर मातीचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्षे लागतात त्यामुळे मातीचे महत्त्व पर्यावरण आणि सजीवांच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे.
माती संवर्धन- काळाची गरज
आरोग्यदायक माती हा आरोग्यदायी अन्न निर्मितीचा पाया आहे. पृथ्वीचा एक चतुर्थांश भाग विविध जीवांनी व्यापला असून ही जैवविविधता टिकवून ठेवण्यात मातीचा मोलाचा वाटा आहे. मातीमध्ये पाणी साठविण्याची आणि ते शुद्ध करण्याची क्षमता आहे, तसेच पूर व दुष्काळासारख्या संकटालाही मातीमुळे मात मिळते. विविध वनस्पतींच्या लागवडीसाठी किंवा अन्न, वस्त्र (कापूस, ताग सारखे विविध धागे) इंधन आणि औषधी वनस्पतींच्या व्यवस्थेसाठी माती मूलाधार आहे. मातीतील विविध घटक कर्बचक्रात महत्त्वाची भूमिका बजावतात. वातावरणातील बदल सहन करणे आणि तो सौम्य करणे यासाठी माती सहाय्यभूत ठरते. जल व्यवस्थापन आणि पूर व दुष्काळ या आपत्तींना तोंड देऊन परिस्थिती पूर्वपदावर आणण्यातही मातीतील विविध घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. अन्न सुरक्षा आणि शाश्वत भवितव्य मातीवरच अवलंबून असल्याने मातीचे संरक्षण, शाश्वत संवर्धन काळाची गरज आहे.
माती परीक्षणाचे फायदे
माती संवर्धनासाठी माती परीक्षण करून घेऊन त्यानुसार उपयोजना केल्यास त्या फायदेशीर ठरतात त्यामुळे जमिनीतील उपलब्ध घटकांचे प्रमाण समजते. त्यावर आधारित पिकांच्या गरजेप्रमाणे आवश्यक तेवढेच खत दिल्यामुळे आर्थिक बचत होते. जमिनीच्या प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन करता येते. खतांचा संतुलित वापर केल्यामुळे पिकांची वाढ चांगली होऊन अधिक उत्पादन मिळते. जमिनीची सुपीकता आजमावता येते. जमिनीतीत काही दोष असतील तर ते देखील समजतात आणि दोषानुसार जमीन सुधारण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करण्यात येतात.
माती परीक्षण कसे करावे
शेतकऱ्यांनी कागदावर लिहून तो कागद माती नमुन्याच्या पिशवीत टाकावा.
1) माती नमुना क्रमांक
2) माती नमुना घेतल्याची तारीख
3) शेतकऱ्याचे संपूर्ण नाव
4) मोबाईल क्रमांक
5) गाव/पोस्ट
6) तालुका
7) जिल्हा
8) सर्व्हे /गट क्रमांक
9) नमुन्याचे प्रातिनिधी क्षेत्र
10) जमीन प्रकार बागायत / जिरायत
11) मागील हंगामातील पीक / जात
12) पुढील हंगामातील पीक / जात
13) मातीची खोली सें.मी.
14) जमीनीचा उतार
15) जमीनीची काही विशेष लक्षणे-खारवट, चोपण,आम्ल व इतर
16) पाण्याचा निचरा बरा / वाईट
17) माती गोळा करणाऱ्याची स्वाक्षरी घेऊन मातीचे नमुने संबंधित गावातील कृषी सहायक / कृषी पर्यवेक्षक/ मंडल कृषी अधिकारी यांच्यामार्फत किंवा शेतकत्यांनी स्वत: जिल्हा मृद चाचणी प्रयोग शाळेकडे वरील प्रमाणे माहिती भरुन पाठवावा.
मातीचा नमुना केव्हा व कोठे घ्यावा ?
मातीचा नमूना पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी (सेंद्रीय व रासायनिक खते देण्यापूर्वी) व खते दिल्यानंतर तीन महिन्यांनी घ्यावा. मातीचा रंग, जमिनीचा खडकाळपणा, उंच- सखलपणा, पिकातील फरक व बागायत / जिरायत स्थिती लक्षात घेऊन त्याप्रमाणे शेतीचे वेगवेगळे भाग पाडावेत व त्या प्रत्येक भागाला विशिष्ट क्रमांक द्यावेत. प्रत्येक भागाचा वेगळा नमूना घेण्यात यावा.
खालील ठिकाणांहून मातीचे नमुने घेऊ नयेत
गुरे बसण्याची व झाडाखालची जागा, खते व कचरा टाकण्याची जागा, दलदल व घराजवळची जागा, पाण्याच्या पाटाजवळील जागा, बांधाजवळचे क्षेत्र, झाडाझुडाचे क्षेत्र याठिकाणचे माती नमुने टाळावेत.
जमीन सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना
जमिनीचा चोपणपणा वाढत आहे. त्यासाठी उतारास समांतर चर काढून पाण्याचा निचरा होईल अशी काळजी घ्यावी. हेक्टरी 5 ते 10 टन जिप्सम पूड व 15 ते 25 गाड्या चांगले कुजलेले खेणखत जमिनीत मिसळून घालवे. हिरवळीच्या खतासाठी ताग, धैंचा, शेवरी सारखी पिके घेऊन फुलावर येताच जमिनीत गाडावीत. भात, कापूस, गहू, शेवरी यासारखी पिके घ्यावीत. जमीनीच्या पृष्ठावर आलेले क्षार खरवडून शेताबाहेर टाकून द्यावे. जमिनीचे लहान वाफे करुन त्यात थोडा वेळ वाफा भरुन पाणी साठवून एकदम चरावाटे बाहेर काढून टाकावे, म्हणजे पाण्याबरोबर क्षार बाहेर जातील. सेंद्रीय खतांचा भरपूर प्रमाणात वापर करावा.क्षारास दाद देणारी पिके कांदा, भात, कापूस, सूर्यफुल, शेवरी सारखी पिके घ्यावीत. क्षार संवेदनशील पिकांची लागवड करु नये,पिकांची लागण सरीच्या कुशीत करावी. क्षारास दाद देणारी पिके घ्यावीत व पिकांची नियमीत फेरपालट करावी. जास्त प्रमाणात सेंद्रीय व हिरवळीची खते वापरावीत.पिकास योग्य वेळी थोडे थोडे पाणी द्यावे.पाण्याच्या अतिवापरामुळे क्षारांचे प्रमाण वाढल्यास माती परिक्षणानुसार जिप्समची मात्रा ठरवून त्याचा वापर करावा. चांगल्या व मचुळ पाण्याचा एकत्रित वापर करावा.
वरील पद्धतींचा अवलंब करुन आपल्या शेतीचे आणि शेतीतील मातीचे योग्य परीक्षण झाले पाहिजे. शेत जमिनीत खतांचा, पाण्याचा योग्य वापर, जमिनीला आवश्यक असणाऱ्या पिक पद्धतीचा वापर करुन शेतीची सुपिकता मातीची समृद्धता टिकवून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.