नाशिक, (प्रतिनिधी) ५ जानेवारी - शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून लाखोंचा नफा कमविण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी शहरातील एका व्यावसायिकास ७५ लाख रुपयांना गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. नागरिकांना विविध स्वरुपाच्या गुंतवणुकीचे आमीष दाखवून तसेच ई-मिटिंगच्या माध्यमातून सेमिनार घेत ही आर्थिक लूट करण्यात आली असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिलिंद गाढवे, प्रियंका गाढवे, अर्जून पाटीलसह निलेश व हेमंत जंगम व बंधन बँक खातेधारक अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत महात्मानगर भागात वास्तव्यास असलेल्या व्यवासायिकाने फिर्याद दिली आहे. संशयित मिलिंद व प्रियंका हे पती-पत्नी असून उर्वरित संशयित त्यांचे नातलग आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयितांनी व्यावसायिकासोबत संपर्क साधला होता. शेअर बाजारातील गुंतवणुकीची माहिती देत संशयीतांनी लाखोंच्या नफ्याचे दावे केले. यानंतर ई-मिटिंगद्वारे एकत्रित येत सेमिनारद्वारे गुंतवणुकीचे टप्पे समजविण्यात आले. यासह नाशिकमध्ये येत प्रत्यक्ष सेमिनार आणि भेटही संशयितांनी घेतली. फेब्रुवारी ते १९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत हा संपूर्ण प्रकार घडला. संशयितांनी दिलेल्या माहितीनुसार फियार्दीने टप्प्याटप्प्याने ७५ लाख रुपये जमा केले होते. मात्र, कोणताही परतावा न मिळाल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली आहे. वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे हे याप्रकरणाचा तपास करीत आहेत.