नाशिक, (प्रतिनिधी) ५ जानेवारी - शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ पथकाने एका सराईताच्या मुसक्या आवळल्या असून, त्याने माळेगाव एमआयडीसीत साथीदारांच्या मदतीने सशस्त्र दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे. संशयितास सिन्नर एमआयडीसी पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
राहूल निवृत्ती बोडके (२२ मुळ रा. मोडाळे ता. इगतपुरी हल्ली वाडिवऱ्हे राजवाडा) असे अटक करण्यात आलेल्या संशयित सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. शहर पोलिसांच्या वतीने महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांची शोध मोहीम सुरू आहे. खबऱ्यांकडून गुन्हेगारांची माहिती गोळा केली जात आहे. युनिटचे उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण आणि जमादार गुलाब सोनार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
राहुल बोडके हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत महामार्गावरील एक्स्लो पॉईट भागातील दोस्ती अमृततुल्य दुकानाजवळ उभा असल्याची माहिती मिळताच पथकाने धाव घेत त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलीस तपासात त्याने ११ सप्टेंबर रोजी मध्यरात्री माळेगाव एमआयडीसीतील हिंद रेक्टोफायर लिमिटेड या कारखान्यावर साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे. या दरोड्यात सात ते आठ जणांच्या टोळक्याने सुरक्षा रक्षकाचे हात पाय बांधून कारखान्यातील कॉपर वायर व एसी वायरसाठी लागणारे पाईपाचे दोन बंडल असा सुमारे १ लाख २८ हजाराचा ऐवज चोरून नेला होता. या गुह्याची खातरजमा करीत पथकाने संशयितास सिन्नर एमआयडीसी पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.
ही कारवाई युनिटचे प्रभारी हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, जमादार गुलाब सोनार, संजय सानप, चंद्रकांत गवळी, हवालदार अतुल पाटील, मनोज परदेशी, वाल्मिक चव्हाण अंमलदार प्रविण वानखेडे व जितेंद्र वजीरे आदींच्या पथकाने केली.