नाशिक, (प्रतिनिधी) ४ जानेवारी - बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये एकास जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्ष सश्रम कारावास व एक हजार ५०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली. ही घटना सिडकोतील त्रिमुर्ती चौक भागात घडली होती. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
विजय भागचंद बाफना (३२ रा.पवननगर सिडको) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
त्रिमुर्ती चौक परिसरातील अंबड लिंकरोड समोर राहणाऱ्या पीडितेच्या आईने याबाबत फिर्याद दिली होती. १७ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला होता. अल्पवयीन मुलीजवळ बसून आरोपीने विनयभंग केला. ही बाब निदर्शनास येताच जाब विचारला असता आरोपीने महिलेच्या पाणीपुरी गाडीची काचफोडून नुकसान केले होते. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध (पोस्को) व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्याचा तपास उपनिरीक्षक संदिप पवार यांनी केला.
हा खटला कोर्ट क्र.२ च्या जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन.पांढरे यांच्या कोर्टात चालला. सरकारतर्फे अतिरिक्त अभियोक्ता भानूप्रिया पेटकर यांनी बाजू मांडली. न्यायालयाने फिर्यादी, साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अधिकाºयांनी सादर केलेल्या परिस्थीतीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावास व एक हजार ५०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतील ५ हजार रूपयांची रक्कम पिडीतेस नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.