लाचेचा पहिला हफ्ता घेतला... पुढं हे सगळं घडलं...

Share:
Last updated: 04-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ४ जानेवारी - वन कायद्यान्वये जप्त केलेले वाहन सोडण्याच्या मोबदल्यात पन्नास हजार रूपयांच्या लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून ३५ हजार रूपये स्वीकारणाऱ्या हरसूल ता.त्र्यंबकेश्वर येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह वनपालास एसीबी पथकाने रंगेहात पकडून गजाआड केले. न्यायालयाने दोघांना सोमवार (दि.५) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने त्यांच्या नाशिक व अहिल्यानगर येथील घरांची झडती घेतली मात्र स्थावर वगळता फारसी मालमत्ता पथकाच्या हाती लागली नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.

कैलास नवनाथ सोनवणे (रा.बिस्तबाग महल जवळ,नानाचौक तपोवनरोड अहिल्यानगर) व सुनिल बाळासाहेब टोंगारे (रा.देवश्री अपा.ए.टी.पवार शाळेजवळ,बोरगड म्हसरूळ) अशी अटक केलेल्या संशयित लाचखोरांची नावे असून दोघेही हरसूल ता.त्र्यंबक येथील परिक्षेत्रीय कार्यालयात अनुक्र्र्रमे वनपरिक्षेत्र अधिकारी आणि वनपाल पदावर कार्यरत आहे. तक्रारदार यांच्या घराला प्लॅस्टर करायचे असल्याने त्यांनी मुलाच्या नावावर खरेदी केलेला टीसी क्र. एमएच १२ टीआरएफएलके ६९२ हा हायवा डम्पर वाळू भरण्यासाठी खामशेत ता.पेठ येथील नदी पात्रात पाठविला होता. २१ ऑक्टोबर रोजी सदरचा डंपर बेकायदा वाळू भरून ती वाहतूक करतांना मिळून आल्याचा ठपका ठेवत वनविभागाच्या पथकाने वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करीत वाहनासह वाळूचा साठा जप्त केला होता. त्यानंतर तक्रारदाराने जप्त केलेले वाहन सोडविण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी हरसूल परिक्षेत्रीय कार्यालय गाठले असता लाचखोर सोनवणे यांनी पन्नास हजाराची मागणी केली होती.

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधल्याने पथकाने गुरूवारी (दि.१) हरसूल शिवारातील चिरापली फाटा गाठून तक्रार स्विकारली. पडताळणीत पहिला हप्ता म्हणून ३५ हजार व वाहन सोडल्यानंतर उर्वरीत १५ हजार रूपये देण्याचे ठरल्याने तसेच सदर रकमेतील दहा हजाराचा हिस्सा वनपाल टोंगारे याचा असल्याचे समोर आल्याने शुक्रवारी (दि.२) सापळा लावण्यात आला होता. हरसूल परिक्षेत्रीय कार्यालयात दोघांनी ३५ हजार रूपयांची लाच स्विकारताच त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या असून याप्रकरणी उपअधिक्षक स्वाती पवार यांच्या तक्रारीवरून हरसुल पोलीस ठाण्यात गुुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने दोघांना सोमवार (दि.५) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून एसीबी पथकाच्या वतीने शनिवारी नाशिक व अहिल्यानगर येथील घरांची झाडाझडती घेण्यात आली. या गुह्याचा तपास निरीक्षक अतुल चौधरी करीत आहेत. ही कारवाई अधिक्षक भारत तांगडे, अप्पर अधिक्षक माधव रेड्डी व सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक स्वाती पवार, हवालदार शरद हेंबाडे, युवराज खांडवी,अविनाश पवार,दिनेश खैरणार व परशूराम जाधव आदींच्या पथकाने केली.

Comments

No comments yet.