नाशिक, (प्रतिनिधी) ४ जानेवारी - परप्रांतीयास बेदम मारहाण करून जीवे ठार मारल्याप्रकरणी निमगाव मड ता. येवला येथील दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना वडाळा पाथर्डी मार्गावरील मेट्रोझोन भागात घडली होती. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रोशन सुभाष कोटकर (२०) व चंद्रकांत उर्फ महेश भगवान लभडे (१९ रा.दोघे निमगाव मढ ता.येवला) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या घटनेत रामचंद्र रामपराग निशाद (मुळ रा.उत्तरप्रदेश) या तरूणाची हत्या करण्यात आली होती. मेट्रोझोन समोरील श्रीजी प्लाझाच्या बाजूला असलेल्या श्री गुरूकृपा गॅरेज येथे ११ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री ही हत्या करण्यात आली होती. मृत परप्रांतीय आणि आरोपी यांच्यात अज्ञात कारणातून वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेल्याने एकमेकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.
या घटनेत दोघांनी रामचंद्र निशाद यास बेदम मारहाण करीत त्याच्या डोक्यावर काही तरी हत्याराने वार केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत मुरूगल सिगमनी उर्फ तंबी (४४ रा.मंदार बिल्डीग जगन्नाथ मंदिराजवळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्याचा तपास तत्कालीन निरीक्षक निलेश माईनकर यांनी करून पुराव्यानिशी दोषारोप जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केले होते. हा खटला कोर्ट क्र.८ चे न्या.जे.एम.दळवी यांच्या समोर चालला. सरकार तर्फे अतिरिक्त अभियोक्ता आर. एन. निकम व सचिन गोरवाडकर यांनी पाहिले. न्यायालयाने फिर्यादी, साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अधिकाºयांनी सादर केलेले परिस्थीजन्य पुराव्यास अनुसरून दोन्ही आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेतील आठ हजार रूपये मृताच्या वारसांना देण्याचे आदेशही निकालात नमूद करण्यात आले आहे.