नाशिक, (प्रतिनिधी) ४ जानेवारी - नाशिकचा जलदगती गोलंदाज-अष्टपैलू रामकृष्ण घोष व डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव या दोघांनी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उत्तराखंड पाठोपाठ बलाढ्य मुंबई विरुद्ध देखील आपल्या जोरदार कामगिरीने सामना गाजवला. त्यामुळे महाराष्ट्र संघाला १२८ धावांनी मोठा विजय मिळवता आला.
प्रथम फलंदाजी करत महाराष्ट्राने ५० षटकांत ४ बाद ३६६ धावा केल्या. सलामीवीर अर्शिन कुलकर्णीने ११४ तर पृथ्वी शॉने ७१ धावा करत २३ षटकांत १४० धावांची जोरदार सलामी दिली. तिसऱ्या क्रमांकावर खेळत कर्णधार ऋतुराज गायकवाडने ६६ धावा केल्या. ४२.३ षटकांत ३ बाद २७७ वर पाचव्या क्रमांकावर खेळायला आलेल्या रामकृष्ण घोषने तूफान फटकेबाजी केली. त्याने मुंबईच्या गोलंदाजीवर जोरदार आक्रमण करत केवळ २७ चेंडूत ५ षटकार व ३ चौकरांसह नाबाद ६४ धावा करत महाराष्ट्र संघाची धावसंख्या ३६६ पर्यंत नेली. त्यानंतर विजयासाठी ३६७ धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबईला रामकृष्ण घोषने आपल्या चौथ्याच चेंडूवर वलयांकित आंतरराष्ट्रीय यशस्वी जैस्वालला बाद करून मुंबईला मोठा धक्का दिला. प्रदीप दाढेने ही त्याच्या दुसऱ्याच षटकात मुशिर खानला बाद करून २ बाद ४ अशी अवस्था केली. त्यानंतर अंगक्रिश रघुवंशी च्या जोडीने डाव सावरणाऱ्या सिद्धेश लाडला सत्यजित बच्छावने ५२ धावांवर पायचीत केले. तर मुंबईचा यष्टीरक्षक हार्दिक तमोरेला बाद करून सत्यजित बच्छावने मुंबईची अवस्था ६ बाद १७६ अशी केली. रघुवंशीने एकहाती किल्ला लढवत ९२ धावा केल्या. पण महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी ठराविक अंतराने मुंबईचे गडी टिपले. यात प्रदीप दाढेने ३ , सत्यजित बच्छावने २ तर रामकृष्ण घोष, राजवर्धन हंगर्गेकर, विकी ओस्तवाल व अर्शिन कुलकर्णीने प्रत्येकी १ गडी बाद करत मुंबईला २३८ धावांत रोखून ४२ व्या षटकातच महाराष्ट्र संघाला १२८ धावांनी मोठा विजय मिळवून दिला.
प्रथम श्रेणी क्रिकेटची अतिशय महत्त्वाची विजय हजारे ट्रॉफी ही एकदिवसीय मर्यादित ५० षटकांची स्पर्धा, नियमितपणे दरवर्षी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे आयोजित करण्यात येते. त्यात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात २४ डिसेंबर ते ८ जानेवारी दरम्यान जयपूर येथे महाराष्ट्र संघाचे साखळी सामने होत आहेत.
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघाचे बाकी साखळी सामने पुढीलप्रमाणे - ६ जानेवारी - छत्तीसगड व ८ जानेवारी- गोवा.