पुण्यातील मंगेशकर रुग्णालय प्रकरणात धर्मादाय आयुक्तालयाने दिला हा निकाल

Share:
Main Image
Last updated: 04-Jan-2026

पुणे, (प्रतिनिधी) ४ जानेवारी - गर्भवती तनिषा भिसे यांना वेळेवर वैद्यकीय उपचार आणि रुग्णवाहिकेची सुविधा न दिल्याप्रकरणी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांना पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दोषी ठरवले आहे. 

संयुक्त धर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर यांनी दिलेल्या आदेशात, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालय प्रशासनानं आवश्यक वैद्यकीय उपचार देण्यात तसेच रुग्णाला वेळेत दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात कसूर केल्याचे नमूद केले आहे. उपचारांसाठी रुग्णालयाने मागितलेली अनामत रक्कम न भरल्याने उपचारांना विलंब झाला आणि त्यातूनच भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक सचिन बकाळ यांनी रुग्णालय आणि त्याच्या ११ विश्वस्तांविरोधात फौजदारी खटला दाखल केला आहे.

काय आहे तनिषा भिसे प्रकरण?

गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू मागील वर्षी एप्रिल महिन्यात झाला होता. उपचारांसाठी रुग्णालयाने १० लाख रुपयांची अनामत रक्कम मागितली. ही रक्कम न भरल्याने उपचारांना विलंब झाला आणि त्यातूनच तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. उपचार नाकारल्याच्या या गंभीर प्रकरणानंतर विधि आणि न्याय विभाग, मंत्रालय यांच्या निर्देशानुसार रुग्णालयाविरोधात कारवाई सुचवण्यात आली होती. त्यानुसार संयुक्त धर्मादाय आयुक्त क्षीरसागर यांनी या प्रकरणाची स्वयंप्रेरित (सुओ मोटो) चौकशी सुरू केली.

या चौकशीसाठी उपधर्मादाय आयुक्त (पुणे) डॉ. राजेश परदेशी, रुग्णालय शाखेचे अधीक्षक दीपक खराडे तसेच निरीक्षक सचिन बकाळ आणि रवींद्र गावरे यांचा समावेश असलेल्या पथकाने सखोल तपास केला. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक सचिन बकाळ यांनी रुग्णालय आणि त्याच्या ११ विश्वस्तांविरोधात फौजदारी खटला दाखल केला आहे.

या प्रकरणातील आरोपी विश्वस्तांमध्ये पंडित हृदयनाथ मंगेशकर, भारती मंगेशकर, उषाताई मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, डॉ. धनंजय केळकर, डॉ. जितेंद्र क्षीरसागर, अ‍ॅड. पी. एम. खिरे, सचिन व्यवहारे, आर. पी. जोशी आणि डॉ. प्रसाद राजहंस यांचा समावेश आहे. हा खटला न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग, पुणे यांच्या न्यायालयात चालवण्यात येणार आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने यासंबंधी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित रुग्णाला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवलं होतं, पण कोणतीही पूर्वसूचना न देता रुग्ण रुग्णालयातून बाहेर पडला. त्यामुळे आम्हाला त्यांना थांबवता आलं नाही. डॉक्टरांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते थांबले नाहीत, असं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

Comments

No comments yet.