मुंबई, (प्रतिनिधी) ३ जानेवारी - विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पदाचा गैरवापर करत केलेले वर्तन हा आदर्श आचारसंहितेचा भंगच आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज नष्ट केले आहे. निवडणूक आयोग प्रामाणिक नाही हे दिसत आहे. निवडणूक आयोगाने जनाची नाही तर मनाची तरी बाळगून आतापर्यंत गुन्हा दाखल करायला हवा होता, पण आयोग हा भाजपाच्या दावणीला बांधलेला आहे हे पुन्हा अधोरेखित होत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा सभापती, राज्यपाल यांनी अराजकीय भूमिका घ्यायची असते, ते एका अत्यंत महत्वाच्या संवैधानिक पदावर असतात. पण राहुल नार्वेकर हे गुंड, मवाल्यासारखे वागले, विरोधी पक्षाच्या व्यक्तीला दमदाटी केली, त्यांची देहबोली, वर्तन व दमदाटी ही अत्यंत खालच्या पातळीवरची होती, ही शोकांतिका आहे. आपल्या कुटुंबातील व्यक्ती अविरोध निवडून यावेत यासाठी ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा दरवाजा अडवून थांबले होते, विरोधकांना अर्ज भरू न देणे हे त्यांचे वर्तन अशोभनीय असून त्यांनी पदाचा गैरवापर केला आहे.
हरिभाऊ राठोड हे माजी खासदार आहेत, त्यांना धमकावणे, त्यांची सुरक्षा काढून घेण्याचे निर्देश देणे हा काय प्रकार आहे. विधानसभेचे अघ्यक्ष म्हणून ते आदेश देतात, नार्वेकर स्वतःला संविधानापेक्षा मोठे समजायला लागले आहेत. निवडून आल्यानंतर घोडेबाजार होतो हे पाहिले होते पण आता निवडणुकीच्या आधीच, जीसकी लाठी उसकी भैंस, प्रकार सुरु झाला आहे. जे बिनविरोध आले ते काय लोकप्रिय आहेत म्हणून नाही. निवडणुका म्हणजे लोकशाही, मतदान पण हे चक्रच खिळखिळे करण्यात येत आहे आणि याचे देशाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे सपकाळ म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारावरच्या प्रश्नावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, सत्तेतील लोक भ्रष्ट आहेत, त्यामुळे कोणीच कोणावर कारवाई करू शकत नाही आणि सत्तेतून बाहेरही पडत नाहीत पण अजित पवार यांनी मात्र नरेंद्र मोदी व फडणवीस यांनाच आव्हान दिले आहे, असेही सपकाळ म्हणाले.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कुख्यात गुंड निलेश घायवळला पासपोर्ट मिळवून देण्यासाठी मदत केल्याचा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. हा अत्यंत गंभीर प्रकार असून पासपोर्ट कायदा, 1967 चा भंग आहे. कुख्यात गुंडांस परदेशात जाण्यास मदत करणे हा राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणे आहे. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांचा तात्काळ राजीनामा घेऊन या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी केली पाहिजे.