नायगाव (सातारा), (प्रतिनिधी) ३ जानेवारी - नायगावचे नाव 'क्रांतीज्योती सावित्रीनगर' करण्यासाठी शासनाने कार्यवाही करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीच्या निमित्ताने राज्यात विविध उपक्रम राबवावे. या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या 'फुले शाहू आंबेडकर आंतरराष्ट्रीय ग्रंथालय' इमारतीचे लोकार्पण करण्यासोबतच पुण्याच्या फुले वाड्याच्या रेंगाळलेल्या कामाला गती देण्यात यावी अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली.
आज ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव नायगाव (सातारा) येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जयंती सोहळा स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित राहून क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमा आणि पुतळ्यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री मकरंद जाधव-पाटील, मंत्री शंभूराज देसाई, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार राम सातपुते, बळीराम सीरस्कार, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी,नायगावच्या सरपंच स्वाती जमदाडे आदी उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, उपस्थितांशी संवाद साधला. १९९३ साली पुणे येथे फुले वाडा स्मारकाचे लोकार्पण तत्कालीन राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर माझे मित्र दिवंगत प्रा. हरी नरके यांनी नायगावी सावित्रीमाईंच्या कार्याची आठवण म्हणून त्यांच्या जन्म झाला त्या घराचा जीर्णोद्धार करण्याची कल्पना मांडली. त्यावेळी उपमुख्यमंत्री असताना यासाठी काही लाख रुपयांचा निधी उभारण्यासाठी केलेली धडपड, त्यासाठीचा संघर्ष याबद्दलची आठवण मांडली. तसेच आज तब्बल १५० कोटी रुपयांच्या स्मारकाचे भूमिपूजन होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
यावेळी पुण्यातील फुले वाडा स्मारकाचे काम वेगाने व्हावे, अशी मागणी मांडली. तसेच २०२७ मध्ये क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांची २०० वी जयंती देशभर साजरी करण्याची घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. याचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या 'फुले शाहू आंबेडकर आंतरराष्ट्रीय ग्रंथालय' या इमारतीचे लोकार्पण करण्यात यावे. याबरोबरच नायगावचे नाव 'क्रांतीज्योती सावित्रीनगर' असे करण्याची ग्रामस्थांची मागणी मांडत त्या दृष्टीने कार्यवाही करण्याची विनंती मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील लगोलग या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामस्थांचा ठराव आल्यानंतर विनाविलंब निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, नायगाव येथे महाज्योती संस्थेच्या वतीने पाच एकर जागा मागितली आहे. याठिकाणी एनडीएच्या धर्तीवर मुलींसाठी सैनिकी प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव देखील अंतिम टप्यात असून यामध्ये शासनाने विशेष लक्ष घालून हेही काम तातडीने मार्गी लावावे अशी मागणी त्यांनी केली.
देवा देता है तो छप्पर फाड के देता है
सन १९९३ साली उपमुख्यमंत्री असताना नायगाव येथील स्मारकाच्या जीर्णोद्धारासाठी काही लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी धडपड करावी लागली. आज मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल १४३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल त्यांचे आभार मानत देवा देता है तो छप्पर फाड के देता है असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.