नाशिक, (प्रतिनिधी) ३ जानेवारी - मित्रास फोन करून बोलाव नाही तर तुझा गेम करतो, असे म्हणत चार जणांच्या टोळक्याने एका रिक्षाचालकास बेदम मारहाण केल्याची घटना सातपूर येथे घडली. या घटनेत लाकडी दांडक्याने रिक्षाचालकास मारहाण करण्यात आल्याने तो जखमी झाला असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय युवराज पाटील (रा.सिन्नर), मनोज लोणे, अभी व एक अनोळखी तरूण अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत मयुर उत्तम शिरवाणी (२८ रा. अशोकनगर सातपूर) या रिक्षाचालकाने फिर्याद दिली आहे. शिरवाणी शुक्रवारी (दि.२) दुपारच्या सुमारास सातपूर येथील बागुल ड्रायव्हिंग स्कूल भागातील थांब्यावर रिक्षा पार्क करून प्रवाशांची प्रतीक्षा करीत असताना ही घटना घडली. संशयितांनी त्यास गाठून शिवीगाळ करत तुझ्या मित्राला फोन करून बोलवून घे नाही तर तुझा गेमच करतो असे म्हणत शिरवाणी यांनी लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत लाकडी दांडक्याचा वापर करण्यात आल्याने रिक्षाचालक जखमी झाला असून त्याच्या जबाबावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार डिगे करीत आहेत.
दहशतीसाठी धारदार शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना अटक
नाशिक - परिसरात दहशत कायम राहवी या उद्देशाने धारदार शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. जुने नाशिक भागातील वेगवेगळ्या ठिकाणी शुक्रवारी (दि.२) दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून त्यांच्या ताब्यातून लोखंडी तलवारीसह धारदार सुरा हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली कारवाई शितळा देवी मंदिराकडून मोदकेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर करण्यात आली. गाडगे महारा मठ परिसरात एक तरूण धारदार सुऱ्याचा धाक दाखवत दहशत माजवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी पथकाने धाव घेत रोहित सुरेश वाघमारे (रा.भोरेगल्ली पेठरोड) याच्या हनुमान मंदिर परिसरात मुसक्या आवळल्या. संशयिताच्या अंगझडतीत धारदार सुरा मिळून आला असून याप्रकरणी अंमलदार जावेद शेख यांनी फिर्याद दिली आहे.
दुसरी कारवाई तलवडी भागात करण्यात आली. अजरूद्दीन नुरमोहम्मद शेख (३५ रा.आंबेडकर पुतळ्याजवळ पंचशिलनगर गंजमाळ) या संशयिताकडे तलवार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दुपारच्या सुमारास पथकाने धाव घेत सार्वजनिक शौचालय भागात संशयिताच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून त्याच्या ताब्यातील लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे. याबाबत अंमलदार गुरूदादा गांगुर्डे यांनी फिर्याद दिली असून तपास हवालदार शेळके आणि सय्यद करत आहेत.